नवरात्री उत्सवात घर राहील प्रसन्न! मधुर स्वरात म्हणा देवीच्या सुंदर आरत्या (Marathi And Hindi Devi Aarati For Navratri Festival)

नवरात्री उत्सवात घर राहील प्रसन्न !
मधुर स्वरात म्हणा देवीच्या सुंदर आरत्या  (Marathi And Hindi Devi Aarati For Navratri Festival) 
***
मित्र-मैत्रिणींनो सस्नेह नमस्कार ! 
पक्ष पंधरवडा संपत आला आहे. आता घरोघरी नवरात्र उत्सवाची तयारी सुरू आहे. यंदाच्या नवरात्रीत काय काय करायचे, याची लिस्ट प्रत्येकाच्या मनात तयार झाली आहे. घरातील पसारा आवरणे, कपडे धुणे, भिंती स्वच्छ करणे, घरात साचलेले जाळेजळमट काढून घर कसे स्वच्छ दिसेल, याची काळजी घेतली जात आहे. अनेकांची नवरात्रीची तयारी झालीही असेल, तर काही जण त्याचेच Planning करीत असतील. आज येथे तुम्हाला मिळणार आहे, सुंदर सुमधुर देवीच्या हिंदी - मराठी आरत्यांची भेट (Marathi Devi Aarati, Hindi Devi Aarati). घरातील सगळ्यांनी एकत्र म्हणाव्यात अशा श्री रेणुकामाता, श्री तुळजा भवानी आणि नवदुर्गा देवीच्या विविध आरत्या. 

* नवरात्री उत्सवाची तयारी (Aarati, Rangoli For Navdurga Festival)

जुन्या काळात म्हणजेच 20-30 वर्षे आधी, जेव्हा मोठे घर, वाडे असायचे, त्यावेळी घटस्थापना (Ghatathapana) होण्याआधी देवघर रंगवले जायचे. निदान एक भिंत तरी रंगवून, तिथे आपल्या कुलदेवतेचे चित्र काढण्याची पद्धत होती. त्यानंतर घरातील समई, निरंजन, दिवे स्वच्छ करून ठेवले जायचे. घरातील एकही कोपरा अस्वच्छ राहू नये, यासाठी आई बाबा आणि सगळेच झाडू, पोच्छा घेऊन कामे करीत असत. बाजारातून रांगोळीची पुस्तके आणून ठिपक्यांची रांगोळी काढण्याचा सराव व्हायचा. रंगीत रांगोळीची खरेदी, उपवासाच्या पदार्थांची तयारी असा सगळा एक मोठा कार्यक्रमच असायचा नवरात्र उत्सवाच्या तयारीचा.  आता घरेही त्या तुलनेत लहान होत चालली आहेत. असो.
नवरात्री उत्सवाच्या तुमच्याही काही सुंदर आठवणी नक्कीच असतील, त्या आम्हाला Comment मध्ये अवश्य कळवा. 

* शारदीय नवरात्र उत्सव (Shardiya Navratri Festival)

संपूर्ण वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण-उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव (Shardiya Navratri Festival). रविवार, 15 ऑक्टोबर 2023 ला घटस्थापना होऊन, शक्ती आणि भक्तीचे महात्म्य सांगणाऱ्या माता नवदुर्गा उत्सवाला प्रारंभ होईल. घरातील सगळे या भक्तिमय प्रसंगात एकत्र येतील.

* नवरात्री उत्सवाची माहिती (Information About Navratri Festival) 

 आदिमाया आदिशक्ती अंबाबाईच्या या उत्सवात देवघराजवळ सुंदर मंडपी बांधतात. त्यावर घरी तयार केलेला फुलोरा सजविला जातो. शेतातील माती घरी आणून ती पत्रावळीवर किंवा गोलाकार कापलेल्या केळीच्या पानावर पसरली जाते. नवरात्रीत या मातीला "वावरी" (Wawari) असे म्हणतात. यात पाच प्रकारची धान्ये - पंचधान्ये - टाकली जातात. शेजारी पितळेची सुंदर आणि भव्य समई लावली जाते. ही समई निरंतर प्रज्वलित असते. त्यासाठी कापसाच्या तशा वाती वळल्या जातात. या दिव्याला "नंदादीप" (Nanda Deep) म्हणतात. मधोमध मातीच्या अथवा तांब्याच्या घटाची स्थापना केली जाते. त्यावर ताम्हण (Plate) ठेवून त्यात देवघरातील देवीचा टाक पूजन करून ठेवला जातो. दररोज पूजा आणि आरतीच्या वेळी या धान्याला पाणी दिले जाते. म्हणजेच शिंपडले जाते. सकाळ आणि सायंकाळच्या आरतीवेळी खूप प्रसन्न वाटते. घरात टाळ शंख, घंटेचा निनाद, घरातील कुटुंबीयांचे एकत्रित स्वर, एकत्र जमलेले काका काकू, ताई, दादा, वहिनी, मंद धूप आणि उदबत्तीचा सुगंध, टाळ्यांचा गजर असे मन प्रसन्न करणारे वातावरण असते. नऊ दिवसांच्या काळात हे धान्य चांगले उगवते. यालाच "धन" (Dhan) म्हणतात. नवमीच्या दिवशी हेच धन देवीला अर्पण करतात. दसरा किंवा विजया दशमीला (Dahshara - Vijaya Dashami) जेव्हा आपण सीमोल्लंघन करतो, त्यावेळीही आसपासच्या मंदिरातही देवी देवतांना हेच धन अर्पण केले जाते. त्यासह आपट्याची पाने म्हणजेच सोने अर्पण केले जाते. 

* नवरात्रीत म्हणावयाच्या देवी आरत्या 

* दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी (Durge Durghat Bhari) 
---
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी | अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी | वारी वारी जन्म मरणाते वारी | हरी पडलो आता संकट निवारी || १ || जय देवी जय देवी महिषसूरमर्दिनी | सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी || धृ || 
त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही | चारी श्रमले परंतु न बोलवे काही | साही विवाद करिता पडिले प्रवाही | तें तू भक्तालागी पावसी लवलाही || २ || 
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा | क्लेशापासुनि सोडावि तोडी भवपाशा अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा | नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा | जय देवी जय देवी जय महिषसूरमर्दिनी | सुरवर ईश्वर वरदे तारक || ३ ||


* आश्विन शुध्द पक्षी अंबा (Ashwin Shudh Pakshi Amba) 
---
आश्विन शुध्द पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो | प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो | मूलमंत्र जप करुनी भोवती रक्षक ठेवुनी हो | ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ || उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो | उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ || 
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो | सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो | कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो | उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो | उदो || 
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो | मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो | कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो | अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो | उदो || ३ || 
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो | उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो | पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो | भक्तांच्या माउली सुर तें येती लोटांगणी हो | उदो || ४ || 
पंचमीचे दिवशी व्रत तें उपांग ललिता हो | अर्घ्य पाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो | रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो | आनंदे प्रेम तें आले सदभावे क्रीडता हो | उदो || ५ || 
षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो | घेउनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो | कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो | जोगवा मागता प्रसन्न झाली भक्ताकुळा हो | उदो || ६ || 
सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो | तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो | जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो | भक्त संकटी पडतां झेलुनी घेसी वरचेवरी हो | उदो || ७ || 
अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो | सह्याद्री पर्वती राहिली उभी जगज्जननी हो | मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो | स्तनपान देऊनी सुखी केलें अंत:करणी हो | उदो || ८ || 
नवमीचे दिवशी नऊ दिवसाचे पारणे हो | सप्तशती जप होमहवने सदभक्ती करुनी हो | षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो | आचार्य ब्राह्मणा तृप्त केलें कृपे करुनी हो | उदो || ९ || 
दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो | सिंहारूढ करी दारूण शस्त्रे अंबे त्वां घेउनी हो | शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो | विप्रा रामदासा आश्रम दिधला तो चरणी हो | उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो || १० || 


* लो लो लागला अंबेचा (Lo Lo Lagla Ambecha) 
---
लो लो लागला अंबेचा, 
भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा, 
धंदा मूळ मायेचा ।। ध्रु.।। 
प्रपंच खोटा हा, मृगपाणी घोरे फिरतो प्राणी। 
कन्या-सुत-दारा-धन माझे मिथ्या वंदितो वाणी। 
अंती नेतील हे यमदूत। न ये संगे कोणी। 
निर्गुण रेणुका कुलदेवी जपतो मी निर्वाणी।। लो लो लागला ।।१।।
पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर। 
नयनी देखिला आकार। अवघा तो ईश्वर।
 नाही सुख-दुःख देहाला कैचा अहंकार। 
पाहे परमात्मा, तो ध्यानी भासे शून्याकार।। लो लो लागला ।।२।।
ध्याता मुद्रा ही उन्मनी लागे अनुसंधानी। 
निद्रा लागली अभिध्यानी जें का निरंजनी। 
लीला वर्णिता स्वरूपाची शिणली शेष वाणी। 
देखिला भवानी, जननी त्रैलोक्य पावनी।। लो लो लागला ।।३।।
गोंधळ घालीन मी अंबेचा घोष अनुहाताचा। 
दिवट्या उजळूनिया सदोदित पोत चैतन्याचा। ओहं सोहं हो, उदो उदो बोली चारी वाचा।।। लो लो लागला ।।४।।
पाहता मूळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ जेथे जगदंबा अवधूत। दोघे भोपे भट। जेथे मोवाळे विंजाळे प्रणिता पाणी लोट। तेथे तानाजी देशमुख झाला ब्रह्मनिष्ठ ।।५।।
----

* जय जय भवानी मनरमणी (Jay Jay Bhavani Manramani)

जय जय भवानी, मनरमणी, मातापूरवासिनी चौदा भुवनांची, स्वामिनी, महिषासुरमर्दिनी जय जय भवानी || धृ ||
नेसुनी पाटाव पिवळा, हार शोभतो गळा |
हाती घेउनिया त्रिशूळा | भाळी कुमकुम टिळा || जय जय भवानी || १ ||
जय जय भवानी, मनरमणी || धृ ||
अंगी लयुनिया काचोळी, वर मोत्यांची जाळी |
ह्रुदयी शोभतसे पदकमली | कंठी हे गरसोळी || जय जय भवानी || २ ||
जय जय भवानी मनरमणी || धृ ||
पायी घागरीया रुणझुन, नाकी मुक्ताफळ |
माथा केश हे कुरळ | नयनी हे काजळ || जय जय भवानी || ३ ||
जय जय भवानी मनरमणी || धृ ||
सिंहावरी तू बैसुनी, मारिती दानवगण |
तुजला विनवितो | निशी दिन गोसावी नंदन || जय जय भवानी || ४ ||
जय जय भवानी मनरमणी  || धृ ||
---

* माहूर गडावरी गं तुझा वास (Mahur Gadavari Ga Tuza Waas) 

माहूर गडावरी माहूर गडावरी गं तुझा वास, भक्त येतील दर्शनास ॥धृ.॥
पिवळे पातळ गं पिवळे पातळ बुट्टेदार, अंगी काचोळी हिरवीगार
पितांबराची गं पितांबराची खोवून कास, भक्त येतील दर्शनास ॥१॥

बिंदीबिजवरा गं बिंदीबिजवरा भाळी शोभे, कर्णि बाळ्या न वेल झुबे
हिच्या नथेला गं हिच्या नथेला हिरवा घोस, भक्त येतील दर्शनास ॥२॥

सरी ठुसीन गं सरी ठुसीन मोहनमाळ, जोडवे मासोळ्य़ा पैंजन चाळ
पट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा कमरेला, हाती हिरवा चुडा शोभला ॥३॥

जा‌ईजु‌ईची गं जा‌ईजु‌ईची आणली फुले, भक्त गुंफीती हारतुरे
हार घालिते गं हार घालिते अंबे तुला, भक्त येतील दर्शनाला ॥४॥

हिला बसायला गं हिला बसायला चंदनाचा पाट, इला जेवायला चांदीचे ताट
पुरणपोळी गं पुरणपोळी भोजनाला, मुखी तांबुल देते तुला
खण-नारळाची खण-नारळाची ओटी तुला, भक्त येतील दर्शनाला ॥५॥

माझ्या मनीची गं मानस पूजा, प्रेमे अर्पिली अष्टभुजा
मनोभावाने गं मनोभावाने पुजीते तुला, भक्त येतील दर्शनाला ॥६॥
माहूर गडावरी माहूर गडावरी गं तुझा वास, भक्त येतील दर्शनास ॥धृ.॥
----
* जय जय जगदंबे श्री अंबे (Jay Jay Jagdambe Shree Ambe) 

जय जय जगदंबे श्री अंबे। रेणुके कल्पकदंबे ।। धृ
अनुपम स्वरूपाची । तुझी घाटी । अन्य नसे या सृष्टी। तुझ सम रूप दुसरे । परमेष्टी ॥
करिती झाला कष्टी । शशी रसरसला । वदनपुटी ।
दिव्य सुलोचन दृष्टी । सुवर्ण रत्नांच्या ॥
शिरी मुकुटी । लोपती रविशशी कोटी । गजमुखी तुज स्तविले । 
हे रंभे मंगल सकलारंभे॥ जय जय जगदंबे ॥ १ ॥

कुमकुम शिरी शोभे । मळवटी । कस्तुरी तिलक ललाटी। नासिक अति सरळ। हनुवटी ।।
रुचिरामृत रस ओठी। समान जणू लवल्या । धनकोटी । आकर्ण लोचन भ्रुकुटी । शिरी नीट भांगावळी । उफराटी ॥
कर्नाटकाची घाटी । भुजंग नीळरंगा । परी शोभे ।
वेणी पाठी वरी शोभे ॥ जय जय जगदंबे ॥ २ ॥

कंकणे कनकाची । मनगटी । दिव्य मुदा दश बोटी बाजूबंद नगे । बाहुबटी ॥ चर्चुनी केशर उटी । सुगंध  पुष्पांचे हार कंठी। बहु मोत्यांची दाटी। अंगी नवी चोळी । जरीकाठी ॥ पीत पितांबर तगटी । पैंजण पदकमळी। अति शोभे ।
भ्रमर धावती लोभे ।। जय जय जगदंबे ॥३ ॥

साक्षप तू क्षितिजा । तळवटी । तूच स्वये जगजेठी। ओवाळीन मी आरती दीपताटी॥
घेउनी करसंपुष्टी । करुणामृत हृदये । संकष्टी ।
धाविसी भक्तांसाठी । विष्णू सदा बहु कष्टी ॥
देशील जरी निजभेटी । तरी मग काय उणे ।
या लाभे।
धाव पाव अविलंबे ॥जय जय जगदंबे ॥ ४ ॥

* जय देवी श्री देवी, रेणुकामाते (Jay Devi Jay Devi Renukamate)

जय देवी श्री देवी, रेणुकामाते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती।
वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती॥१॥

जय देवी श्री देवी, रेणुकामाते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
भाग्यवती तू जननी, परशुरामाची।
तेहतीस कोटी देवांवरी, तव सत्ता साची ॥२॥

जय देवी श्री देवी, रेणुकामाते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
सीता, लक्ष्मी, पार्वती, यल्लम्मा सारी।
तुझीच नाना नावें नाना अवतारी ॥३॥

जय देवी श्री देवी, रेणुकामाते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
जगदेश्वरी जगदंबे, व्यापिसी विश्वाला।
मिलिंद माधव भावे वंदितसे तुजला ॥४॥

जय देवी श्री देवी, रेणुकामाते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
----
* जय अम्बे गौरी (Jay Ambe Gauri Maiya Jay Shama Gauri)

जय अंबे गौरी,
मैया जय श्यामा गौरी ।
तुमको निशदिन ध्यावत,
हरि ब्रह्मा शिव री ॥
ओम जय अंबे गौरी ॥

मांग सिंदूर विराजत,
टीको मृगमद को ।
उज्ज्वल से दो नैना,
चंद्रवदन नीको ॥
ओम जय अंबे गौरी ॥

कनक समान कलेवर,
रक्ताम्बर राजै ।
रक्तपुष्प गल माला,
कंठन पर साजै ॥
ओम जय अंबे गौरी ॥

केहरि वाहन राजत,
खड्ग खप्पर धारी ।
सुर-नर-मुनिजन सेवत,
तिनके दुखहारी ॥
ओम जय अंबे गौरी ॥

कानन कुण्डल शोभित,
नासाग्रे मोती ।
कोटिक चंद्र दिवाकर,
सम रजत ज्योती ॥
ओम जय अंबे गौरी ॥

शुंभ-निशुंभ बिदारे,
महिषासुर घाती ।
धूम्र विलोचन नैना,
निशदिन मदमाती ॥
ओम जय अंबे गौरी ॥

चण्ड-मुण्ड संहारे,
शोणित बीज हरे ।
मधु-कैटभ दो मारे,
सुर भयहीन करे ॥
ओम जय अंबे गौरी ॥

ब्रह्माणी, रुद्राणी,
तुम कमला रानी ।
आगम निगम बखानी,
तुम शिव पटरानी ॥
ओम जय अंबे गौरी ॥

चौंसठ योगिनी मंगल गावत,
नृत्य करत भैरों ।
बाजत ताल मृदंगा,
और बाजत डमरू ॥
ओम जय अंबे गौरी..॥

तुम ही जग की माता,
तुम ही हो भरता,
भक्तन की दुख हरता ।
सुख संपति करता ॥
ओम जय अंबे गौरी ॥

भुजा चार अति शोभित,
वर मुद्रा धारी ।
मनवांछित फल पावत,
सेवत नर नारी ॥
ओम जय अंबे गौरी ॥

कंचन थाल विराजत,
अगर कपूर बाती ।
श्रीमालकेतु में राजत,
कोटि रतन ज्योती ॥
ओम जय अंबे गौरी ॥

श्री अंबेजी की आरति,
जो कोइ नर गावे ।
कहत शिवानंद स्वामी,
सुख-संपति पावे ॥
ओम जय अंबे गौरी ॥

जय अंबे गौरी,
मैया जय श्यामा गौरी ।
----
* देवीचा जोगवा (Devicha Jogva)  

* अनादी निर्गुणी प्रगटली (Anadi Nirguni Pragatali Bhavani) 

अनादी निर्गुणी प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर मर्दना लागूनी ।
त्रिविध तापाची करावया झाडणी ।
भक्तालागी तू पावसी निर्वाणी ॥१॥

आईचा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारूनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेदरहित वारीसी जाईन ॥२॥

नवविध भक्तीच्या करुन नवरात्रा ।
करुणा पोटी मागेन मी ज्ञानपुत्रा ।
धरीन सद्‍भाव अंतरीच्या मित्रा ।
दंभ सासर्‍या सांडीन कुपात्रा ॥३॥

पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन मी कुर्वंडी ।
अद्‍भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥

आता साजनी झाले मी नि:संग ।
विकल्प नवर्‍याचा सोडियला संग ।
काम-क्रोध हे झोडियले अंग ।
केला मोकळा मार्ग हा सुरंग ॥५॥

ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाऊनी नवस मी महाद्वारी फेडिला ।
एका जनार्दनी तो देखियला ।
जन्ममरणाचा फेरा मी चुकविला ॥६॥
----

* विपुल दयाघन गर्जे (Vipul Dayaghan Garje Tav Hrdyambar)

विपुल दयाघन गर्जे तव हृदयांबर श्रीरेणुके वो । 
पळभर नरमोराची करुणा वाणी ही आईके ||धृ|| 

श्रमलीस खेळुनी नाचूनी गोंधळ घालूनि ब्रह्मांगणी वो| निजलिस कशी दीनाची चिंता सोडुनी अंतःकरणी वो | उठ लवकर जगदंबे त्र्यैलोक्याची तू स्वामिनी वो | विधी हरी हर अज्ञानी पूर्ण ज्ञानी तू शहाणी वो | समर्थ परमेश्वरी तू अनंत ब्रह्मांड नायिके वो ||१|| 
पळभर नरमोराची करुणा वाणी ही आईके ||

शरणागत मी आलो परि बहू चुकलो बहु बोलावया वो | तुज जननीचे नाते लाज न वाटे लावावया वो | परि तूं दिनांची जननी अनाथांची तुज बहु दया वो| हे श्रुति सत्य की असत्य अनुभव आलो मी पहावया वो | कळेल तैसी करी परि निज ब्रीद रक्षी मम पालिके वो || २ || 
पळभर नरमोराची करुणा वाणी ही आईके ||

भवगदे पिडलो भारी मजला दुःख हे सोसेना वो | 
अजुनी अंबे तुजला माझी करुणा का येईना वो | 
तारी अथवा मारी धरिले चरण मी सोडीना वो | 
कृपा केलियावाचुनी विन्मुख परतुनी मी जाईना वो | तुजवीन जगी कोणाचे वद पद प्रार्थावे अंबीके वो || ३ ||
पळभर नरमोराची करुणा वाणी ही आईके ||

ऐकूनी करुणा वाणी ह्दयी सप्रेम द्रवली हो|
प्रसनमुख जगदंबा अंबा प्रसन्न जाहली हो|
अजरामर वर द्याया प्रगटुनी पुढे उभी राहिली हो| 
भक्तांकित अभिमानी विष्णुदासाची माऊली हो|
जी निज इच्छा मात्रे सुत्रे हालवी कवतुके हो ||४|| 
पळभर नरमोराची करुणा वाणी ही आईके ||
----
मित्रांनो, हा लेख आपणास उपयुक्त ठरेल, अशी आम्ही आशा व्यक्त करतो. घटस्थापना विधी आणि पद्धती यामध्ये किरकोळ अंतर किंवा फरक असू शकतो. पण या उत्सवामध्ये असलेली आपल्या मनातील भक्तिभावना महत्त्वाची. आई जगदंबेचा हा उत्सव आपण सगळे मिळून आनंदात साजरा करूयात. हा लेख आपणास आवडला, तर नक्की कळवा. आपल्या सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अमूल्य आहेत. आणि हो, आपल्या मित्र परिवारात नक्की शेअर करा. धन्यवाद. 
|| जय जगदंब || 
Previous Post Next Post