कोण आहेत देवीच्या आरतीमधील ६४ योगिनी !प्राचीन मंदिरांची अनोखी माहिती

* कोण आहेत देवीच्या आरतीमधील ६४ योगिनी!
प्राचीन मंदिराची अनोखी माहिती 
(64 Yogini | Chausath Yogini | Names Of Chausath Yogini | 64 Yogini Temple | ६४ योगिनी रूपे | Navratri Yogini)
***
मनामनात भक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा, आदिमाया आदिशक्ती भगवतीचा नवरात्री उत्सव (Navratri Festival) सुरू झाला आहे. भक्तिमय वातावरणात घराघरात घटस्थापना झाली आहे. मंगल आरतीचे स्वर कानी पडत आहेत. भक्तांना तारणारी माता अंबाबाई, माता महालक्ष्मी, माता दुर्गादेवी, भगवती श्री रेणुकामाता, विद्यादात्री माता सरस्वती, माता महाकाली अशा अनेक रूपात जगत जननी आपल्या लाडक्या भक्तांसाठी धावून येते. भक्तांचे मनोरथ पूर्ण करते. 

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ||

नवरात्र उत्सवात घराघरात म्हणली जाणारी आरती म्हणजे उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो...! नवरात्रीच्या नऊ दिवसांचे आणि विजया दशमी अर्थात दसरा सणाचे वर्णन या आरतीत येते. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमीपर्यंतच्या प्रत्येक दिवसाचे वर्णन आणि माहात्म्य या आरतीत येते. हा प्रत्येक दिवस पुराणात घडलेल्या विशिष्ट घटनांशी, प्रसंगांशी जोडला गेला आहे. अशीच ही आरती म्हणत असताना एक कडवे असे येते - 
 
* उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो | 
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ || 
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो | सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो | 
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो | 
उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो | 
 उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ||२||

* 64 योगिनी कोण आहेत? 
(Who Are 64 Yogini | Where Is 64 Yogini Temple) 

ही आरती म्हणत असताना दुसऱ्या चरणात चौसष्ट योगिनींचा उल्लेख येतो. यावर मनात विचार आला की, या चौसष्ट योगिनी कोण आहेत? त्यांचे स्वरूप कसे असावे? 64 योगिनी मंदिर आहे का? चौसष्ट योगिनी मंदिर कुठे आहे? 64 योगिनी, त्यांची नावे कोणती? याविषयी बराच शोध घेतल्यानंतर मिळालेली माहिती खरोखर अद्भुत आणि विलक्षण होती. आपणासही ही माहिती नक्कीच आवडेल. या लेखात ६४ योगिनी शिल्प आणि पुरातन मंदिराचे काही फोटो दिले आहेत. हे मंदिर आहे मध्य प्रदेशात मोरेना येथे. या प्राचीन शिल्पांची मधल्या काळात तोडफोड झाली, पण हे अवशेषही अतिशय सुंदर, रेखीव आहेत. प्राचीन भारतीय शिल्पकलेचा वारसा सांगणारी आहेत. 

* 64 योगिनींची निर्मिती कथा 
(64 Yogini Story - 64 Yogini Katha)

योगिनी हा शब्द योग या अर्थाने येतो. योगशास्त्रात प्रवीण असलेले स्त्री शक्तीचे स्वरूप म्हणजे योगिनी. माता सतीचे तीन प्रमुख अवतार असलेल्या माता महाकालीने 64 योगिनीच्या रूपात अवतार धारण केले आहेत. या 64 योगिनी अलौकिक योग आणि तंत्रशक्तीने परिपूर्ण आहेत. भारताच्या काही प्रदेशांमध्ये नवरात्री उत्सवात या रूपांची आराधना केली जाते. या 64 योगिनींची नावेही (64 yogini names in marathi and English) चमत्कारिक आणि विस्मयकारक आहेत. देवीची ही नावे (64 yogini) समजण्याआधी आपण जाणून घेऊ त्यांच्या उत्पत्तीबद्दल (64 yogini story - katha). 

शास्त्र आणि पुराणातील काही कथांमध्ये या 64 योगिनी भगवान श्रीकृष्ण यांच्या नासिकेतून प्रकट झाल्याचे सांगितले आहे. 64 योगिनींची संख्या 64 याविषयी असे सांगितले जाते की, या सृष्टीत स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत. स्त्री आणि पुरुष यांच्या एकत्र येण्यातून हे सृष्टी चक्र गतिमान होते. यातील प्रत्येक स्त्री 32 कलागुणांनी परिपूर्ण असते, तर पुरुषाकडेही 32 कलागुण असतात. या दोघांच्या मिलनातून 64 कलांची निर्मिती होते. या पूर्ण कलांतूनच 64 योगिनी (64 yogini) उत्पन्न झाल्या आहेत. याविषयी इतरही काही कथा (64 yogini story) सांगितल्या जातात. 64 योगिनी ब्रह्मांड व्यापून आहेत. स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक अशा तिन्ही लोकांमध्ये 64 योगिनींचा संचार आहे. 

* 64 योगिनींची निर्मिती सांगणारी 
आणखी एक कथा (64 yogini story - katha)

दिव्य शक्तींचे भांडार असलेल्या या ६४ योगिनींची आणखी एक कथा पुराणात सांगितली जाते. ६४ योगिनी या शाक्त संप्रदायाच्या देवता. रक्तबीज नामक दानवाच्या नाशासाठी जगदंबा मातेने त्याच्याशी युद्ध केले. पण या राक्षसाला एक वर मिळाला होता. तो असा होता की, त्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडला तर त्यातून एक नवीन राक्षस तयार होईल. मातेने त्याच्या नाशासाठी आणि त्याचे रक्त प्राशन करण्यासाठी ६४ शक्तींची निर्मिती केली. या ६४ शक्तींच्या साहाय्याने तिने रक्तबीबज या राक्षसाचा वध केला. या पुराण कथेतून असुरांचे निर्दालन करणाऱ्या माता भगवतीच्या या घोर पराक्रमाची संगती ६४ योगिनींशी लावली आहे. 

* तुम्हाला ६४ योगिनींची नावे माहिती आहेत का? 
ही आहेत ६४ योगिनींची नावे 
(64 yogini names in marathi and english)
१. बहुरूपा (Bahurupa), २. तारा (Tara), ३. नर्मदा (Narmada) , ४. यमुना (Yamuna), ५. वाराही (Varahi), ६. रणवीरा (Ranveera), ७. वानरमुखी (Vanarmukhi), ८. वैष्णवी (Vaishnavi), ९. छिन्नमस्तिका (Chhinnamastika), १०. वृषवाहना (Vrisvahana), ११. ज्वालाकामिनी (Jwala Kamini), १२. घटवार (Ghatwar), १३. भलुका (Bhaluka), १४. नारसिंही (Narasimhi), १५. बिरजा (Birja), १६. विक्ताना (Viktana), १७. करकरी (Karkari), १८. सर्पश्या (Sarpashya), १९. यक्षिणी (Yakshini), २०. विनायकी (Vinayaki), २१. कामिनी (Kamini), २२. घटाबरी (Ghatabri), २३. स्तुती (Stuti), २४. काली (Kali), २५. ज्वालामुखी (Jwala Mukhi), २६. आग्नेयी (Agneyi), २७. अदिती (Aditi), २८. चंद्रकांती (Chandrakanti), २९. धूमावती (Dhumavati), ३०. गांधारा (Gandhara), ३१. सर्वमंगला (Sarva Mangala), ३२. अजिता (Ajita), ३३. ऐंद्री (Aindri), ३४. बेतली (Betli), ३५. कौवेरी (Kauveri), ३६. रति (Rati), ३७. भद्रकाली (Bhadrakali) , ३८. क्षेमंकरी (Kshemankari), ३९. चर्चिका (Charchika), ४०. बिरूपा (Birupa), ४१. समुद्रा (Samudra), ४२. मूर्ती (Murti), ४३. अघोर (Aghor), ४४. गंगा (Ganga), ४५. वारुणी (Varuni), ४६. वैद्यरूपा (Vaidyarupa), ४७. सरस्वती (Saraswati), ४८. वीरकुमारी (Veer Kumari), ४९. चामुंडा (Chamunda), ५०. वायुवीणा (Vayu Veena), ५१. ब्रह्मिनी (Brahmani), ५२. माहेश्वरी (Maheshwari), ५३. शांती (Shanti), ५४. कालरात्री (Kalratri), ५५. कराकाली (Karakali), ५६. महालक्ष्मी (Mahalakshmi), ५७. विंध्यवासिनी (Vindhyavasini), ५८. उमा (Uma), ५९. वायुवेगा (Vayuvega), ६०. सूर्यपुत्री (Suryaputri), ६१. अंबिका (Ambika), ६२. महामाया (Mahamaya), ६३. कौमारी (Kaumari), ६४. नारायणी (Narayani). 
यौगिक आणि तांत्रिक शक्तींनी समृध्द असलेली ही ६४ योगिनींची नावे (64 yogini names in marathi and english) आहेत. 

* 64 योगिनींचे मंदिर कुठे आहे? (where is 64 yogini temple) 
भारतात काही निवडक प्रदेशात चौसष्ट योगिनींचे मंदिर आहे. अशी एकूण चार मंदिरे आहेत. दोन मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) आणि दोन ओडिशा (Odisha) राज्यात. ओडिशा राज्यातील हिरापूर येथे आणि राणीपूर येथे ६४ योगिनी मंदिर आहे. तसेच मध्य प्रदेशात मोरेना आणि जबलपूर येथे ६४ योगिनी मंदिर आहे. साधारणतः आठव्या त्या दहाव्या शतकाच्या दरम्यान या मंदिरांचे बांधकाम झाले आहे. या मंदिरांची आणखी एक खासियत अशी की, ही मंदिरे बिना छताची आणि गोलाकार आहेत. याला चौसठ जोगिनी मंदिर असेही म्हणतात. मध्य प्रदेशात मोरेना येथील मंदिर अतिशय सुंदर पुरातन स्थापत्य कलेने सजलेले आहे. एकदा नक्की भेट द्या.

आदिशक्तीचा नवरात्री उत्सव साजरा करीत असताना, हा लेख आपणास नक्कीच आवडेल, अशी आम्हाला आशा आहे. वरील मंदिरांना आपणही कदाचित भेट दिली असेल. तुमचे अनुभव, सूचना आणि अभिप्राय Comment Section मध्ये नक्की नोंदवा. ते आम्हाला प्रेरक ठरतील. आपणास आणि आपल्या कुटुंबास शारदीय नवरात्र उत्सवाच्या भक्तिमय शुभेच्छा...! 
---------
© संदीप प्रभाकर कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर. 


Previous Post Next Post