कधी करताय तुलसी विवाह ! तुलसी विवाह मुहूर्त आणि तुळशीचे महत्व

कधी करताय तुलसी विवाह ! तुलसी विवाह मुहूर्त आणि तुळशीचे महत्व 
(Tulsi Vivah | Tulsi Vivah Muhurat | तुळशीचे लग्न | तुलसी विवाह पद्धत)
***
मित्र - मैत्रिणींनो सस्नेह नमस्कार! 
आज येथे आपण जाणून घेणार आहोत, यंदाच्या वर्षी तुलसी विवाह कधी करायचा आहे, तसेच घराच्या अंगणात तुळस का महत्त्वाची आहे आणि भारतीय संस्कृतीत तुळशीला का महत्व दिले गेले आहे याबद्दल. तसेच या वर्षीचे तुलसी विवाह मुहूर्त आणि तुळशीचे लग्न करण्याचा विधी याविषयीची माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. 

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सुरू झालेला दिवाळीचा उत्साह (Diwali Fever) तसाच कायम असतो तो कार्तिकी पौर्णिमेपर्यंत. आकाशदिवे आणि लायटिंग तशीच चमकत असते, कारण याच दिवसात प्रत्येक मराठी माणसाच्या घरात लगीनघाई सुरू असते. विवाहाची तयारी सुरू असते. हे तुळशीचे लग्न (Tulsi Vivah) असते. कार्तिकी एकादशीपासून पुढचे चार दिवस हा तुलसी विवाह सोहळा सगळ्या घरात अगदी थाटामाटात साजरा होतो. कदाचित, तुमच्या घरीदेखील तीच तयारी सुरू असेल. चला तर मग, जाणून घेऊ तुलसी विवाह (tulshi vivah | tulshiche lagna) याविषयी. 
* तुळशी विवाह मुहूर्त केव्हा आहे? तुलसी विवाह कसा करायचा? 
(Tulsi Vivah Muhurat | Tulasi Vivah Vidhi | tulashi vivah) 
तुमच्या या वरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच लेखात मिळणार आहेत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ घरात तुळशीचे महत्व काय आहे, धर्म शास्त्र आणि पुराणात तुळशीला किती महत्त्व दिले गेले आहे. परमात्मा भगवान विष्णूला प्रिय असणाऱ्या या तुळशीला हरिप्रिया असेही म्हणतात. भगवान कृष्णाला नैवेद्य (Bhog) दाखविताना तुळशी पत्र आवर्जून लागतेच. एवढी तुळस भगवान श्रीकृष्ण यांना प्रिय आहे. 

* तुळशीची आणखी किती नावे आहेत? 
(Names Of Tulsi | Importance Of Tulsi) 

हिंदू धर्मात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे. तुळशीचे शास्त्रीय नाव आहे - Holy Basil. तुळशीचे रोपटे मांगल्याचे आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. त्यामुळेच प्रत्येक मराठी माणसाच्या घरात छोटेसे का होईना, तुळशीचे रोपटे असतेच. तुळशीला अनेक नवे आहेत. तिला वृंदा असे म्हणतात. तसेच वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुळस आणि कृष्णजीवनी अशी तुळशीची आठ नावे आहेत. विष्णूला प्रिय असल्याने तिला वैष्णवी असेही म्हणतात. तुळशीच्या आठ नावांचे अर्थही येथे देत आहोत. वृंदा म्हणजे सर्व वनस्पतींची देवी. वृंदावनी म्हणजे जी सर्वप्रथम वृंदावनात प्रकट झाली. संपूर्ण विश्वात जिला पूजनीय मानले जाते ती विश्वपूजिता. सर्व फुलांमध्ये सर्वात वरचे स्थान जिला प्राप्त झाले ती पुष्पासारा. ज्या फुलांशिवाय भगवान श्रीकृष्ण यांना दुसरे फूल आवडत नाही. जी सर्वांना आनंद देते ती नंदिनी. भगवान कृष्णाचे जीवन आणि आत्मा असलेली कृष्णजीवनी. जी संपूर्ण विश्वाला पवित्र करते ती विश्वपावनी. 

* तुळशीचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व (Information Of Tulsi In Marathi | Importance Of Tulsi) 

प्रत्येक घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते. सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो. तुळस ही स्त्रियांची सखी आहे. सासरी गेलेल्या प्रत्येक स्त्रीला आत्मविश्वास आणि सामर्थ्य देणारी ही तुलसी खरेच स्त्रियांची सखी, मैत्रीण असते. वारकरी संप्रदायातही तुळशीला मानाचे स्थान आहे. वारकरी बांधव ईश्वरावरील भक्तिभावाने गळ्यात तुळशीची माळ घालतात. तसे पाहता, तुळस ही पुदीना वर्गातील वनस्पती आहे. अनेक लहान मोठ्या आजारात घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांमध्ये तुळशीचा वापर केला जातो. त्यामुळे औषध दृष्टीनेही तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळस ही जवळपास सर्वच आजारांवर गुणकारी सिद्ध होते. फक्त भारतातच नाही, तर आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्येही तुळस आढळते. लहानपणी खेळताना एखादा किडा किंवा मुंगी चावली तर आई पटकन तुळशीच्या रोपातील माती लावत असे, हे अनेकांना आठवत असेल. मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूचे भांडार म्हणजे तुळशीचे झाड. तुळस वातावरणात सतत प्राणवायू सोडते. त्यामुळे तुळशी वृंदावनाला (Tulsi Vrindavan) प्रदक्षिणा घातल्याने आपल्याला भरपूर प्राणवायू मिळतो. 
 * तुळशीचे लग्न कधी करावे ? या वर्षी तुलसी विवाह शुभमुहूर्त कोणते ? 
(Tulashiche Lagna | Tulsi Vivah Muhurat | Tulsi Vivah Vidhi) 

यंदाच्या वर्षी तुळशी विवाह कधी आहे? त्याचा पूजा विधी आणि शुभ मुहूर्त याविषयी जाणून घेऊया.
भगवान श्रीकृष्ण यांना परमप्रिय असलेल्या तुळशीला सर्व वनस्पतींमध्ये पवित्र मानले जाते. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव तिच्या शाखांमध्ये राहतो, तर सर्व तीर्थक्षेत्रे तुळशीच्या मुळात सामावली आहेत. माता गंगाही तिथेच आहे. जगातल्या सर्व देव देवता तिच्या देठात आणि पानांमध्ये वास करीत आहेत, असे मानले जाते. प्रत्येक वर्षी घराघरात दिवाळीनंतर विशिष्ट कालावधीत तुलसी विवाह किंवा तुळशीचे लग्न लावण्याची पद्धत आहे. यामुळे घरातल्या मुलामुलींच्या विवाहात कुठलीही बाधा किंवा अडचण येत नाही, तसेच न जुळणारे विवाहदेखील लगेच जुळतात, अशी धारणा आहे. आपल्याकडे तुळशीचे लग्न लावल्याशिवाय दुसरे विवाह सोहळे होत नाहीत. त्यामुळे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात तुलसी विवाह सोहळा संपन्न होतो. तुलसी विवाह सोहळा पार पाडण्यासाठी मोठी तयारी केली जाते. सर्वात आधी तुळशी वृंदावन किंवा तुळस लावलेल्या कुंडीला आकर्षक रंग देतात. तिथे सजावट केली जाते. तसेच त्या तुळशी वृंदावनावर - श्री राधा दामोदर प्रसन्न - असे लिहून सुंदर असे श्रीकृष्ण आणि राधेचे चित्र रेखाटले जाते. तुळशीच्या रोपाला सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवले जाते. तुळशीचा विवाह देवघरातील रंगनाथ अर्थात बाळकृष्णाशी लावला जातो. हा विवाह सोहळा सायंकाळच्या वेळी गोरज मुहूर्तावर साजरा करण्यात येतो. यावेळी तुळशीला फुलांचा हार, गजरा, मंगळसूत्र, बांगड्या आणि खण नारळ अर्पण केले जाते. एखादी नवरी मुलगी नटावी असे तुळशीला सजवल्यामुळे घरात खरोखर लगीनघाई असल्यासारखे वाटते. तुलसी आणि भगवान श्रीकृष्ण यांना अभिषेक स्नान घातले जाते. गंध, अक्षता, पुष्प अर्पण करून मनोभावे प्रार्थना केली जाते. सामान्य लग्न सोहळ्यासारखी मंगल अष्टके, दिवाळीची आतषबाजी, तुळशीला नैवेद्य, सर्व कुटुंबाचे एकत्रित भोजन असा खूपच सुंदर सोहळा ठरतो तुलसी विवाहाचा. कार्तिकी एकादशीनंतर पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह (tulasi vivah | tulshiche lagna) करता येतो. त्यातही द्वादशी या दिवशी केलेला विवाह सोहळा अधिक लाभदायी असतो, असे मानतात. यंदाच्या वर्षी तुळशी विवाह शुक्रवारी म्हणजेच २४ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होतील. श्रद्धा आणि भक्तिभावाने द्वादशीनंतर थेट पौर्णिमेपर्यंत तुम्ही तुलसी विवाह करू शकता. शुक्रवार, २४ नोव्हेंबर २०२३ रोजी तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त सकाळी ११.४३ पासून दुपारी १२.२६ पर्यंत आहे. त्यानंतर दुपारी १.५४ ते २.३८ पर्यंतचा कालावधी अतिशय सुंदर आहे. या दिवशी तुलसी विवाह केल्यास शुभ फलप्राप्ती होईल, असे सांगितले आहे. 
* दीपोत्सवाची खरी सांगता 
(Diwali Festival | Happy Diwali | Shubh Dipavali) 
दीपावली उत्सवाची खऱ्या अर्थाने सांगता तुलसी विवाह झाल्यानंतर होते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुरू झालेला हा दीपोत्सव अशा आनंदी आणि उत्साही वातावरणात संपतो. आपणही आपल्या दैनंदिन जीवनात रममाण होऊन जातो. पुढे लगेच नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल होते. आणि घरात नवीन कॅलेंडर येते. सर्वात आधी आपली नजर एक गोष्ट शोधत असते, ती म्हणजे दिवाळी केव्हा आहे. माणसाच्या मनाला उभारी देणारा, नवी आशा, नवी स्वप्ने देणारा हा दीपोत्सव त्यामुळेच तर सर्वांचा लाडका आहे. मित्रांनो, लेख आवडला तर नक्कीच कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आमच्यासाठी अमूल्य आहेत. 
मनःपूर्वक धन्यवाद...! 
***

Previous Post Next Post