श्री रामरक्षा स्तोत्र का वाचावे? अर्थासहित रामरक्षा!| Why To Read Shri Ram Raksha | Ram Raksha Marathi Arth |

श्री रामरक्षा स्तोत्र का वाचावे? अर्थासहित रामरक्षा!
| Why To Read Shri Ram Raksha | Ram Raksha Marathi Arth | Meaning Of Ram Raksha Stotra In Marathi | Kaa Vachavi Ram Raksha | Benefits Of Ram Raksha Stotra | श्री राम रक्षा स्तोत्र मराठी अर्थ | 
(Photo Courtesy : Google Images)
-----
मित्र - मैत्रिणींनो, सस्नेह नमस्कार! 
तुम्ही श्री रामरक्षा स्तोत्र नक्कीच वाचले असेल. ऐकलेही असेल. आजही अनेक शाळांमध्ये लहान मुलांकडून श्री रामरक्षा स्तोत्र (Shri Ram Raksha Stotra) पाठ करून घेतले जाते. ज्या कुटुंबात आजी आजोबा आहेत, अशा घरातील अनेक लहान मुलांना श्री रामरक्षा स्तोत्र (Shri Ram Raksha) अगदी शुद्ध उच्चारात म्हणता येते. तुमच्यापैकी अनेकांना अजूनही हे सुंदर पवित्र श्री रामरक्षा स्तोत्र (Shri Ram Raksha Stotra) येत असेल. आजच्या या ब्लॉगमध्ये (Blog About Shri Ram Raksha Stotra And Marathi Arth) आपण जाणून घेणार आहोत श्री राम रक्षा स्तोत्र दररोज म्हटल्यास कोणकोणते फायदे (Benefits Of Shri Ram Raksha Stotra) होतात, अवघड संस्कृत भाषेत असलेल्या श्री राम रक्षा स्तोत्राचा मराठीतून काय अर्थ होतो आणि दररोज घरात सकाळी किंवा संध्याकाळी हे सुंदर पवित्र श्री रामरक्षा स्तोत्र (Shri Ram Raksha Stotra) का म्हणावे, याबद्दल. 

* श्री राम रक्षा स्तोत्र काय आहे? या स्तोत्राचे महत्त्व काय? 
| What Is Shri Ram Raksha Stotra | Importance Of Shri Ram Raksha Stotra |
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचे एकवचनी, एकबाणी आणि एकपत्नी असे वर्णन केले जाते. ज्या दिवशी राज्याभिषेक सोहळा व्हायचा, त्या दिवशी आपल्या माता पित्याच्या आज्ञेनुसार ज्यांनी 14 वर्षांचा वनवास पत्करला ते श्रीराम, ज्यांनी शबरीची उष्टी बोरे चाखली ते श्रीराम, ज्यांनी माता अहिल्येचा उध्दार केला ते श्रीराम, ज्यांनी अहंकारी रावणाचा नाश केला ते श्रीराम... असा खूप मोठा महिमा भगवान श्रीराम यांच्या जीवनाशी निगडित आहे. विचार - विनय - विवेक आणि सदाचाराचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे भगवान श्रीराम. त्यामुळेच सर्व देवी-देवतांमध्ये परम कृपाळू श्रीराम यांचे स्थान अग्रभागी आहे. भगवान श्रीरामाची स्तुती करणारे हे स्तोत्र आहे. श्री रामरक्षा स्तोत्र (Shree Ram Raksha Stotra) संस्कृत भाषेत आहे. श्री रामरक्षा स्तोत्र (Shree Ram Raksha Stotra) बुधकौशिक ऋषी यांनी लिहिले आहे. या स्तोत्रात वर्णन केल्यानुसार, भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषी यांना स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना रामरक्षा स्तोत्र सांगितले. त्यानुसार त्यांनी सकाळी उठल्यानंतर या राम रक्षा स्तोत्राची रचना केली. जीवनात प्रत्येक कठीण प्रसंगात भगवान श्रीरामांनी आपले रक्षण करावे, अशी विनंती आणि प्रार्थना श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये केली आहे. भारतीय संस्कृतीत श्री रामरक्षा स्तोत्र म्हणण्याला खूप महत्त्व दिले आहे. श्री रामरक्षा स्तोत्र (Shree Ram Raksha Stotra) नियमित पाठ केल्याने आपल्या जीवनातील संकटे दूर होतात. मनाला शांती लाभते. आपले जीवन निरोगी, सुखी समृध्द आणि संपन्न होते. रामनवमी उत्सव, नवरात्र उत्सवात आणि इतर अनेक प्रसंगांत श्री रामरक्षा स्तोत्राचे सामुदायिक वाचन केले जाते. हिंदी भाषिक लोकांमध्ये जसे श्री रामचरित मानस (Shri Ram Charit Manas) प्रसिद्ध आहे, तसेच मराठी माणसांच्या घरात श्री रामरक्षा स्तोत्र (Shree Ram Raksha Stotra) म्हणण्याची पद्धत आहे. श्री रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक श्लोक (Shri Ram Raksha Shloka) आणि त्यांचा मराठी भाषेतून अर्थ (Shri Ram Raksha Shloka Marathi Arth) येथे देत आहोत. 
--------
(Photo Courtesy : Google Images)

* असे आहे संस्कृत भाषेत श्री रामरक्षा स्तोत्र ! श्री रामरक्षा स्तोत्राचा मराठी अर्थ 
| Shri Ram Raksha Stotra In Sanskrit | Marathi Meaning Of Shri Ram Raksha |

|| श्री रामरक्षा स्तोत्र || 

।। श्रीगणेशाय नमः ।।

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य। बुधकौशिकऋषिः।
श्रीसीतारामचन्द्रो देवता।
अनुष्टुप् छन्दः।
सीता शक्ति :।
श्रीमद्धनुमान् कीलकम्।
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः।

।। अथ ध्यानम् ।।
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं । पीतं वासो वसानं नवकमलदलस्पनिर्धनेत्रं प्रसन्नम्। वामाङ्कारदीप्तं मुखकमलमिल्लोचनं नीरदाभं । नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ।। इति ध्यानम् ।
(अर्थ : ज्यांनी धनुष्यबाण धारण केले आहेत, बद्ध पद्मासन विराजित आहेत, पितांबर धारण केलेले आहेत, ज्यांचे प्रसन्न नयन नवीन कमळाशी स्पर्धा करतात आणि डाव्या बाजूला बसलेल्या श्री सीताजींच्या कमळाचे मुख आहेत, ते अजानुबाहू, मेघश्याम श्री रामचंद्रांचे ध्यान करतात. विविध अलंकारांनी सजलेले आणि विशाल जटाजूटधारी श्रीरामचंद्रजींचे ध्यान करा)

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । एकैकरमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ।।१।। 
(अर्थ : श्री रघुनाथाचे चरित्र अतिशय विस्तृत आहे. त्यात शंभर कोटी श्लोक आहेत. त्या श्लोकांतील एकेक अक्षर महापातकांचा नाश करणारे आहे.)

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् । जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥
(अर्थ : श्रीरामचंद्राचा नीलकमलाप्रमाणे श्यामवर्ण आहे. डोळे कमळाप्रमाणे विशाल आणि प्रफुल्लित आहेत. जानकी व लक्ष्मण त्याच्यासमवेत आहेत. जटांच्या मुगुटामुळे तो सुशोभित दिसत आहे.)

सासितूणधनुर्वाणपाणिं नक्तंचरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥
(अर्थ : ज्याच्याजवळ तलवार आहे. पाठीला बाणांचा भाता आहे. धनुष्य व बाण ज्याने हातात घेतले आहे. जो राक्षसांचा नाश करणारा आहे. जन्मरहित व व्यापक असणारा परमेश्वर जगताचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या लीलेने, श्रीरामचंद्राच्या रूपाने अवतरला आहे.)

रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४।।
(अर्थ : तेव्हा सुज्ञांनी श्रीरामचंद्राचे ध्यान करून पापांचा नाश करणारी व सर्व मनोकामना परिपूर्ण करणारी रामरक्षा म्हणावी. रघुकुलोत्पन्न श्रीराम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथात्मज श्रीराम माझ्या कपाळाचे रक्षण करो.)

कौसल्येयो दृशौ पातु विश्वमित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ।।५।। 
(अर्थ : कौसल्येय श्रीराम माझ्या डोळ्यांचे रक्षण करो. विश्वमित्रप्रिय श्रीराम माझ्या कानांचे रक्षण करो. यज्ञरक्षक श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करो. सौमित्रिवत्सल श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो.)

जिह्वां विद्यानिधीः पातु कण्ठं भरतवन्दित:।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ।।६।। 
(अर्थ : सर्व विद्यांचा साठा असलेला श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण करो. भरत ज्याला वंदन करतो असा श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य तेजस्वी शस्त्रे ज्याच्यापाशी आहेत असा श्रीराम माझ्या खांद्याचे रक्षण करो. शिवधनुष्य भंग करणारा श्रीराम माझ्या बाहूंचे रक्षण करो.) 

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ।।७।। 
(अर्थ : सीतेचा पती श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो. परशुरामाला जिंकणारा श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो. खर राक्षसाला ठार मारणारा श्रीराम माझ्या शरीराच्या मध्य भागाचे रक्षण करो. जांबवंताला आश्रय देणारा श्रीराम माझ्या नाभीचे रक्षण करो.)

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः। ऊरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् ।।८।।
(अर्थ : सुग्रीवाचा स्वामी राम माझ्या कंबरेचे रक्षण करो. हनुमंताचा प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही जंघांचे रक्षण करो. राक्षसांच्या कुळाचा विनाश करणारा रघुत्तम श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करो.)

जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः। पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥
(अर्थ : सेतू बांधणारा श्रीराम माझ्या गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुखी रावणाचा नाश करणारा श्रीराम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो. विभीषणाला राज्यलक्ष्मी देणारा श्रीराम माझ्या पायांचे रक्षण करो. याप्रमाणे श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो.)

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥ 
(अर्थ : श्रीरामाच्या सामर्थ्याने युक्त अशी ही रामरक्षा आहे. या रामरक्षेचे पठण जो पुण्यवान मनुष्य करील त्याला दीर्घायुष्य, सुख, पुत्र, विजय आणि विनय हे सर्व प्राप्त होईल.)

पातलभूतलव्योमचारिणश्छद्मचरिणः। न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ।।११।। 
(अर्थ : पाताळ, पृथ्वी व आकाश यापैकी कोठेही संचार करणारे दुष्ट कपटी लोक रामनामाने रक्षण केलेल्या मनुष्याकडे पाहू शकत नाहीत.)

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् । नरो न लिप्यते पापैर् भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥
(अर्थ : श्रीराम, श्रीरामभद्र, श्रीरामचंद्र ही नावे उच्चारून स्मरण करणाऱ्याला पाप लागत नाही. त्याला सर्व सुखे प्राप्त होऊन शेवटी मुक्ती मिळते.)

जगज्जैत्रेकमन्त्रेण रामानाम्नाभिरक्षितम्। यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ।।१३।।
(अर्थ : जगामध्ये जय प्राप्त करून देणारा मुख्य मंत्र श्रीरामाचे नाव हाच आहे. या रामनामाने अभिरक्षित केलेली कोणतीही वस्तू, (रामनामाने मंतरलेला अंगारा इत्यादी) जो गळ्यामध्ये धारण करील, त्याला सर्व सिद्धि हस्तगत होतील.)

वज्रपञ्जरनामेदमं यो रामकवचं स्मरेत्। अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम् ।।१४।।
(अर्थ : हे रामकवच वज्राच्या पिंजऱ्याप्रमाणे संरक्षक आहे म्हणूनच याला वज्रपंजर असे नाव आहे. जो या रामकवचाचे स्मरण करील त्याची आज्ञा कुठेही कधीही अमान्य केली जाणार नाही. त्याचा सर्वत्र विजय होईल. त्याचे कल्याण होईल.)

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः। तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ।।१५।। 
(अर्थ : भगवान शिवशंकराने ही रामरक्षा जशी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात सांगितली, तशी ती त्यांनी प्रातःकाळी उठल्यावर लिहून काढली.)

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्। अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ।।॥१६॥ 
(अर्थ : श्रीराम हा कल्पवृक्षांची जणू सुंदर बागच आहे. सर्व आपत्ती दूर करणारा आणि त्रैलोक्याला आनंद देणारा मनोहर असा तो श्रीमान राम हा आमचा प्रभू आहे.)

तरुणौ रुपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ। पुण्डरिकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ।।१७।। 
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचरिणौ । पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥ 
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्। रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमौ ।।१९।।
(अर्थ : तरुण, रूपवान, सुकुमार, महाबलवान, कमळाप्रमाणे विशाल नेत्र असलेले, वल्कले व कृष्णाजिन हीच वस्त्राप्रमाणे परिधान करणारे, कंदमुळे व फळे भक्षण करणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी, सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे, सर्वश्रेष्ठ धनुर्धर, राक्षसकुळांचा संहार क़रणारे, रघुकुलातील प्रमुख दशरथाचे पुत्र, राम - लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करोत.)

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षया शुगनिषङ्गसङ्गिनौ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥२०॥
(अर्थ : बाण जोडून धनुष्य सज्ज करणारे, अक्षय बाणांचे भाते बाळगणारे राम-लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी मार्गामध्ये निरंतन पुढे चालोत.)

संनद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा। गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ।।२१।। 
(अर्थ : नेहमीच सज्ज असलेला, अंगात चिलखत घातलेला, हाती खड्ग बाळगणारा, धनुष्यबाण धारण करणारा, जणू आमचा मनोरथच की काय असा लक्ष्मणासह जाणारा श्रीराम आमचे रक्षण करो.)

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली। काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः ॥२२।। 
(अर्थ : ज्याचा सेवक लक्ष्मण आहे, जो शूर व बलिष्ठ आहे, असा ककुत्स्थकुलोत्पन्न, दशरथ व कौसल्या यांचा पुत्र, रघुत्तम राम हा पूर्ण ब्रह्म आहे.)

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः। जानकी वल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ।।२३।। 
(अर्थ : वेदान्तानेच जाणता येईल असे यज्ञाधिपती पुराणपुरुषोत्तम, अतुल पराक्रमी, वैभवसंपन्न, जानकीवल्लभ श्रीरामाचे स्वरूप आहे.)

इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः। अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः ।॥२४॥ 
(अर्थ : श्रीरामाच्या नावाचा श्रद्धापूर्वक जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य प्राप्त होते, यात संशय नाही.)

रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् । स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः।॥२५॥ 
(अर्थ : जो दूर्वादलाप्रमाणे श्यामवर्ण आहे. ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत. ज्याने पीतांबर परिधान केला आहे, अशा श्रीरामाची स्तुती दिव्य नावांनी जे करतात, ते संसारात असूनही नसल्यासारखेच असतात.)

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं। काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्। राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम्।
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२६॥ 
(अर्थ : लक्ष्मणाचा वडीलबंधू, सीतेचा पती, ककुत्स्थाच्या वंशात उत्पन्न झालेला, करुणेचा सागर, गुणनिधी, ब्राह्मणप्रिय, धार्मिक, राजश्रेष्ठ, सत्यप्रतिज्ञ, दशरथाचा पुत्र, श्यामवर्णाची सुंदर शांतमूर्ती, लोकांना आनंद देणारा, रघुकुलाचे भूषण असलेला रघुकुलश्रेष्ठ आणि रावणाचा शत्रू असा जो राघव श्रीराम त्याला मी वंदन करतो.)

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः।।२७।।
(अर्थ : राम, रामभद्र, रामचंद्र, वेधा, रघुनाथ, नाथ अशी ज्याला नावे आहेत त्या सीतापती श्रीरामाला माझा नमस्कार असो.)

श्रीराम राम रघुनन्दन राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम । श्रीराम राम रणकर्कश राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम ।।२८।। 
(अर्थ : हे श्रीरामा, तू रघुकुलनंदन आहेस. भरताचा ज्येष्ठ बंधू आहेस. तू रणांगणात कठोर होतोस. हे श्रीरामा, तू आमचे रक्षण कर.)

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि। श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि। श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि। श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ।।२९।। 
(अर्थ : श्रीरामचंद्राच्या चरणांचे मी मनामध्ये स्मरण करतो. श्री रामचंद्राच्या चरणांचे मी वाणीने स्तवन करतो. श्री रामचंद्राच्या चरणांवर मस्तक ठेवून मी नमन करतो. श्री रामचंद्राच्या चरणांशी मी शरण आलो आहे.)

माता रामो मत्पिता रामचन्द्रः। स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः। सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने ।।३०।।
(अर्थ : माझी माता, माझा पिता श्रीरामचंद्र आहे. माझा धनी, माझा मित्र श्रीरामचंद्र आहे. दयाळू श्रीरामचंद्र हेच माझे सर्वस्व आहे. श्रीरामचंद्रावाचून या जगात मी खरोखरच दुसरे काहीएक जाणत नाही. अजिबात जाणत नाही. मुळीच जाणत नाही.)

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा। पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥३१।।
(अर्थ : ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे. डाव्या बाजूला जनककन्या सीता आहे. पुढच्या बाजूला मारुती आहे. त्या श्रीरामचंद्राला मी वंदन करतो.)

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्। कारुण्यरुपं करुणाकरं तं श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये ।।३२।।
(अर्थ : लोकांना आनंद देणारा, रणांगणामध्ये धैर्य धरणारा, कमळाप्रमाणे नेत्र असलेला, रघुवंशाचा अधिपती, केवळ दयेची मूर्तीच आहे असा जो कृपाळू श्रीरामचंद्र, त्याला मी शरण आलो आहे.)

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥ 
(अर्थ : जो सर्व ठिकाणी मनाच्या वेगाने त्वरेने गमन करणारा व वाऱ्याप्रमाणे प्रचंड वेगाने जाणारा आहे, ज्याने इंद्रिये जिंकून स्वाधीन ठेवली आहेत, जो बुद्धिवंत लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, वानरसमुदायाचा जो मुख्य आहे जो श्रीरामचंद्राचा दूत आहे, अशा वायुपुत्र हनुमंताला मी शरण आलो आहे.)

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्। आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ।।३४।।
(अर्थ : कवितारूपी फांदीवर बसून राम राम या मधुर अक्षरांचे गोड गोड शब्द गुंजन करणाऱ्या वाल्मीकिरूपी कोकिल पक्ष्याला मी वंदन करतो.) 

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥
(अर्थ : आपत्ती दूर करणारा, सर्व संपत्ती देणारा व लोकांना आनंद देणारा असा जो श्रीरामचंद्र त्याला मी पुनः पुनः नमस्कार करतो.)

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्। तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥३६॥ 
(अर्थ : 'राम राम' अशी ही रामगर्जना संसाराची बीजे भर्जन करणारी (नाहीशी करणारी), सुखसंपदा अर्जन करणारी (प्राप्त करून देणारी) आणि यमदूतांना तर्जन करणारी (भय उत्पन्न करणारी) आहे.)

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा भवतु भो राम मामुद्धर।।३७৷৷ 
(अर्थ : राजश्रेष्ठ 'राम' सर्वत्र उत्कर्ष पावतो. नेहमीच विजयी होतो. मी सीतापती `रामास` भजतो. `रामाने` राक्षसांची सेना ठार मारली. त्या `रामाला` माझा नमस्कार असो. रामावाचून मला दुसरा मोठा कोणताच आधार नाही. रामाहून दुसरा कुणीही मला श्रेष्ठ वाटत नाही. मी रामाचा दास आहे. माझ्या चित्ताची लय नेहमी रामाच्या ठिकाणी असो. हे रामचंद्रा, तू माझा उद्धार कर.)

रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ।॥३८।। 
(अर्थ : महादेव शिवशंकर पार्वती देवीला सांगतात, हे सुमुखी, राम राम राम अशा नामोच्चाराने मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठिकाणी मी रममाण होतो, श्रीरामाचे एक नाव विष्णूच्या सहस्रनामाशी बरोबरी करणारे आहे.)

इति श्रीबुधकौशिकविरचितं 
श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्।  
।।श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ।।
(अर्थ : याप्रमाणे श्रीबुधकौशिक ऋषींनी रचलेले श्री रामरक्षा स्तोत्र संपूर्ण झाले.)
(हे श्री सीतारामचंद्राला अर्पण असो.)
॥ शुभं भवतु ॥
------
(Photo Courtesy : Google Images)

श्री रामभक्तीच्या या प्रवाहात आमचे हे पुष्प अर्पण करताना आम्हाला विशेष आनंद वाटतो. विविध धार्मिक कार्यक्रमांत आणि घरातही दररोज श्री रामरक्षा स्तोत्र नक्कीच वाचावे. यामुळे भाविकास धनधान्य, सुख समृद्धी, यश आणि कीर्ती, तसेच उत्तम आरोग्याचा लाभ होतो. आपणही वाचा आणि इतरांनाही पाठवा, हे नम्र आवाहन. 
आपले मनःपूर्वक धन्यवाद....! 
| जय सियाराम | जय सियाराम |
-------------------------

Previous Post Next Post