संकटातून मुक्त करणारे भवानी अष्टकम् नक्की म्हणा ! |Powerful Bhavani Ashtakam|



* दुर्गामातेची करा प्रार्थना 
संकटातून मुक्त करणारे 
भवानी अष्टकम् नक्की म्हणा ! 
|Powerful Bhavani Ashtakam|
|Shrimad Aadi Shankaracharya|
***
नवरात्री उत्सव हा आदिमाया आदिशक्तीचा उत्सव आहे. स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा उत्सव आहे. मनामनात भक्तिभावनेचे नऊ रंग भरणारा उत्सव आहे. हा उत्सव आहे जगाचे पालनपोषण करणाऱ्या आईचा. संकटात भक्तांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या अष्टभुजा महिषासुरमर्दिनीचा. आपल्या लेकराला काय हवं आणि काय नको, हे जसं आईला कळतं, तसंच जगतजननी आई भवानीला आपल्या भक्तांच्या इच्छा काय आहेत, त्याची स्वप्ने कोणती आहेत, त्याला काय हवं आहे, हे निश्चित कळत असतं. नवरात्र उत्सवात (Navratri Festival) आपण श्री जगदंबा मातेची आराधना करतो आणि परमदयाळू करुणामृतहृदयी माता आपल्या लाडक्या भक्तांचे सगळे मनोरथ पूर्ण करते. भक्तांना यश, सुखसमृद्धी आणि मनःशांती प्रदान करते. त्यासाठी विविध श्लोक, मंत्र, जपतप (Devi Shloka And Mantra) करून नऊ दिवस सतत देवीची अखंडित सेवा केली जाते. 

मनामनात भक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा, आदिमाया आदिशक्ती भगवतीचा नवरात्री उत्सव (Navratri Festival) सुरू झाला आहे. भक्तिमय वातावरणात घराघरात दररोज आरतीचे स्वर कानी पडत आहेत. सार्वजनिक नवदुर्गा उत्सवात ठिकठिकाणी गरबा आणि दांडियाने एक निराळेच चैतन्य पसरले आहे. प्रत्येकाच्या मनात आशेचा उमेदीचा एक प्रकाश किरण जागवणाऱ्या या नवरात्री उत्सवात आपण माहिती घेणार आहोत एका शक्तिशाली मंत्राची. श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या भवानी अष्टकम् (Bhavani Ashtakam) या संकटांपासून मुक्ती देणाऱ्या स्तोत्राची. 
* भवानी अष्टकम् (Bhavani Ashtakam) 
याबाबत सांगितली जाणारी एक कथा 
(Story Of Bhavani Ashtakam) 
---
भवानी अष्टकम् स्तोत्राची रचना जगदगुरु आदि शंकराचार्य यांनी केली आहे. भक्तिभावनेने परिपूर्ण आणि देवी भगवतीच्या चरणी समर्पित केलेले हे स्तोत्र अत्यंत सुंदर आणि शक्तिशाली (Powerful Bhavani Ashtakam) आहे. याविषयी एक कथा सांगितली जाते, ती अशी. जगदगुरु आदि शंकराचार्य हे देवाधिदेव महादेवाचे परमभक्त होते. त्यांनी श्री महादेवाचे वर्णन करणारे, त्यांचे अपार माहात्म्य सांगणाऱ्या अनेक श्लोकांची रचना केली. परंतु आदिमाया आदिशक्ती भगवतीविषयी काही लिहिले नाही. एकदा झाले काय की, ते अचानक खूप आजारी पडले. तशा अवस्थेत त्यांना तहान लागत होती, पण पाण्याचे लहानसे पात्र उचलण्याची शक्तीही त्यांच्या अंगी राहिली नव्हती. त्यावेळी माता भगवती त्यांच्यासमक्ष प्रगट झाली, पण तिने जगदगुरु आदि शंकराचार्य यांना कुठलीही मदत केली नाही. मला अशा या क्षीण अवस्थेत हे माते, तू माझी मदत कर. माझा आजार बरा कर, अशी याचना त्यांनी केली. तेव्हा माता भगवती त्यांना म्हणाली, गुरुवर्य, आता तुमचे आराध्य महादेव कुठे आहेत, ज्यांच्याविषयी तुम्ही एवढे श्लोक आणि मंत्र यांची रचना केली आहे? तुम्हाला मदतीची याचना करायची असेल, तर त्यांच्याकडे करा. त्यानंतर आदि शंकराचार्य यांनी भवानी अष्टकम् स्तोत्राची (Powerful Bhavani Ashtakam) रचना केली. या स्तोत्रात भगवती मातेची आराधना करणारे आठ श्लोक आहेत. जो भक्त याचे मनोभावे पठण करतो, त्याला सुखसमृद्धी, आरोग्य, धनसंपत्ती प्राप्त होते, अशी धारणा आहे. 
 * भवान्यष्टकं (भवानी अष्टकम) 
(Bhavani Ashtakam) 
---
न तातो न माता न बन्धुर्न दाता
न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता।
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥१॥

(भावार्थ : हे भवानीमाते ! पिता, आई, भ्राता, दाता, पुत्र, कन्या, सेवक, स्वामी, पत्नी, ज्ञान आणि वृत्ती, यापैकी कोणीही माझे नाही, हे देवी! फक्त तूच माझी परमगती आहेस.)

भवाब्धावपारे महादुःखभिरुः
पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः।
कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥२॥ 

(भावार्थ : हे माते भवानी! मी अथांग भवसागरात अडकलो आहे आणि मी भवदु:खाने ग्रस्त आहे. काम-लोभादि विकाराने या संसार बंधनात बंदिस्त झालो आहे. आता फक्त तूच माझी गती आहेस. तूच माझी परमगती आहेस.)

न जानामि दानं न च ध्यानयोगं
न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रम्।
न जानामि पूजां न च न्यासयोगम्
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥३॥

(भावार्थ :- हे आई भवानी ! ना मी दान करणे जाणतो, ना ध्यानयोग मला अवगत आहे, ना मला तंत्र, मंत्र, स्तोत्रादी यांचे ज्ञान आहे, पूजा आणि न्यास या क्रियाही मला अवगत नाहीत. तेव्हा हे भवानीमाते, तूच माझी गती आहेस आणि तूच माझी परमगती आहेस.)

न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं
न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित्।
न जानामि भक्तिं व्रतं वापि मात्र
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥४॥

(भावार्थ : मी ना पुण्य जाणतो ना मी तीर्थ जाणतो. ना मी मुक्ती जाणतो ना लय. हे आई! भक्ती आणि व्रतवैकल्ये यांचेही मला काही ज्ञान नाही. तेव्हा हे भवानी माते, आता तूच माझी गती आहेस. तूच परमगती आहेस.)

कुकर्मी कुसंगी कुबुद्धिः कुदासः
कुलाचारहीनः कदाचारलीनः।
कुदृष्टिः कुवाक्यप्रबन्धः सदाहम्
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥५॥

(भावार्थ : मी कुकर्मी, कुसंगतीत राहणारा, दुर्बुद्धि, दुष्टदास, कुलाचारहीन सदाचारहीन, दुराचारपरायण, कुत्सित दृष्टि ठेवणारा आणि सदा दुर्वचन बोलणारा आहे. हे माते भवानी ! तूच माझी एकमात्र उत्तम गती आहेस.)

प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं
दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित्।
न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥६॥ 

(भावार्थ : मी ब्रह्मा, विष्णू, शिव, इंद्र, सूर्य, चंद्र वा अन्य कोणत्याही देवतांना जाणत नाही. हे भक्तांना शरण देणारी भवानी माते ! तूच एकमात्र माझी परमगती आहेस.)

विवादे विषादे प्रमादे प्रवासे
जले चानले पर्वते शत्रुमध्ये।
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥७॥

(भावार्थ : हे आई ! तू विवाद, विषाद, प्रमाद, विदेश, जल, अनल, पर्वत, वन आणि शत्रू यांच्यापासून सदैव माझे रक्षण कर. हे भवानीमाते ! तू एकमात्र माझी परमगती आहेस.)

अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो
महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः।
विपत्तौ प्रविष्टः प्रणष्टः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥८॥

(भावार्थ : हे भवानीमाते! मी सदा अनाथ, दरिद्री, जरा-जीर्ण रोगी, अत्यंत दीनदुबळा, मूक, विपत्त्तीने ग्रस्त आहे, नष्ट आहे. आता तूच एकमात्र माझी परमगती आहेस.

|| इति श्रीमच्छंकराचार्यकृतं भवान्यष्टकं सम्पूर्णम् ||

भवानी अष्टकम् स्तोत्र
(Powerful Bhavani Ashtakam)
---
मित्र-मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी वसलेल्या शक्तीचा जागर करणारा हा नवरात्री उत्सव. कोल्हापूरची आई अंबाबाई, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता, माहूरगडवासिनी रेणुकामाता, वणीची सप्तशृंगी माता, अंबाजोगाईची माता योगेश्वरी, छत्रपती संभाजीनगरची ग्रामदेवता कर्णपुरा (Karnpura Devi) यांच्या चरणी साष्टांग नमन. यंदाच्या नवरात्री उत्सवात जीवनातील सर्व संकटांतून मुक्त करणाऱ्या या भवानी अष्टकम् स्तोत्राचे (Powerful Bhavani Ashtakam) अवश्य पठण करा. जय जगदंब. 

आपणास हा लेख आवडल्यास कॉमेंट करा. आपल्या सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अमूल्य आहेत. आवडल्यास आपल्या मित्र परिवारात आवर्जून शेअर करा. 
मनःपूर्वक धन्यवाद. 
-------------

Previous Post Next Post