आज महाअष्टमी
दिवस कुमारी पूजनाचा !
| Mahaashtami | Kumari Pujan | Kanya Pujan | Kumarika Pooja Vidhi | Maha Ashtami |
----
| ओम जयंती मंगला काली |
(Om Jayanti Mangala Kaali)
ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी |
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते||
(भावार्थ : जयंती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा धात्री और स्वधा यासारख्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या हे जगदंबा माते, मी तुला नमन करतो. अर्गला स्तोत्रातील हा पहिलाच श्लोक आहे.)
मित्र - मैत्रिणींनो नमस्कार.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला समस्त भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी स्थानापन्न झालेली आई भवानी जगाच्या कल्याणासाठी निरंतर जागृत आहे. आजपर्यंत आपण दुर्गा मातेची रूपे, अष्टलक्ष्मी, नवरात्री उत्सवाच्या विशेष आरत्या आणि सिद्ध मंत्र आणि श्लोकांची माहिती, ६४ योगिनी कोण, त्यांची मंदिरे भारतात कुठे आहेत, श्री शंकराचार्य यांनी रचलेले भवानी अष्टकं याविषयी येथे माहिती घेतली. नवरात्री उत्सवाचे महत्त्व आणि त्यातील काही विशेष विधीही आपण येथे जाणून घेतले. आज रविवार, 22 ऑक्टोबर 2023 महाअष्टमी. या दिवशी दुर्गा मातेची महापूजा केली जाते. नवरात्री उत्सवात अष्टमी या तिथीला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण याच दिवशी मातेने महिषासुराचा वध केला होता. या दिवशी, दुर्गामातेचा आठवा अवतार - माता महागौरीचे पूजन करतात.
* महाआरती, होमहवन विधी
(Maha aarati, Homhavana Vidhi)
नवरात्र उत्सवाच्या प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पूजा केली जाते. यात कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पूजन महत्त्वाचे मानले जाते. नवरात्री उत्सवात अष्टमीला फार महत्त्व दिले जाते. महाअष्टमीच्या दिवशी महाआरती, होमहवन यासारखे प्रमुख विधी केले जातात. आजचा हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे, तो यासाठी की आजच्याच दिवशी कुमारी पूजन (kumari pujan) किंवा कुमारिका पूजन (kumarika pooja) करतात. घराघरात आणि सार्वजनिक नवदुर्गा उत्सवाच्या ठिकाणी कुमारी पूजेचा (kumari pujan, Kanya Pujan) विधी करतात. श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो. रात्री उशिरापर्यंत होमहवन केले जाते.
* असे करतात कुमारिका पूजन (kumarika pooja, Kanya Pujan)
---
प्राचीन हिंदू धर्मग्रंथानुसार नवरात्री उत्सवामध्ये बालवयातील मुलींचे (कुमारिका) पूजन करण्यास विशेष महत्त्व आहे. शारदीय नवरात्र उत्सवात येणाऱ्या अष्टमी किंवा नवमी तिथीला घरोघरी अगदी भक्तिभावाने कुमारी पूजा (kumari Puja) केली जाते. यात तीन ते नऊ वर्षापर्यंतच्या लहान मुलींना घरी आमंत्रित करून, त्यांना कुंकुम तिलक केला जातो. त्यांना मळवट भरला जातो. अशा मुलींना भोजन, गोड पदार्थ लाडू पेढे आणि केशरी दूध देतात. या सर्व कुमारिका मुलींची पूजा करून, त्यांची ओटी भरण्याची प्रथा आहे. या सर्व कुमारी मुलींना माता दुर्गेचे स्वरूप मानले जाते. यात जितक्या अधिक कुमारी मुलींचे पूजन आपल्या हातून घडेल, तितके ते भाग्याचे मानले जाते. प्राचीन धर्मशास्त्रानुसार एका कुमारिका पूजनाने ऐश्वर्य प्राप्त होते. दोन कुमारिकांची पूजा केल्यास भोग आणि मोक्ष प्राप्ती मिळते. तीन कुमारिका पूजनाने धर्म, अर्थ व काम हे तीन पुरुषार्थ प्राप्त होतात. चार कुमारिका मुलींच्या पूजनाने राज्यपद मिळते, तर पाच कुमारिका पूजनाने विद्याप्राप्ती होते. नवरात्री उत्सवात सहा कुमारिका मुलींच्या पूजनाने सहा प्रकारची सिद्धी मिळते. सात कुमारिका पूजनाने संपदा आणि नऊ कुमारिका पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते, अशी दुर्गा भक्तांची धारणा आहे.
* कुमारिका पूजनाने होणारी फलप्राप्ती
(Kumari Pooja Falprapti)
प्राचीन ग्रंथ आणि धर्मशास्त्रानुसार नवरात्री उत्सवात (Navratri Festival) कुमारी पूजन विधीने पुण्यकारक फलप्राप्ती होते, असे सांगितले आहे. आपण येथे जाणून घेऊया कुमारी मुलींचे वय आणि त्यांच्या पूजनाने मिळणारे पुण्यफल याविषयी.
2 वर्षांची कुमारिका कुमारी
(kanya pujan, Kumari Pooja)
परम श्रद्धा आणि भक्तिभावाने दोन वर्षांच्या मुलीची ‘कुमारी’ म्हणून पूजा केली जाते. या मुलीच्या पूजनाने माता भक्तांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील संकटे नाहीशी होतात.
3 वर्षांची कुमारिका त्रिमूर्ती
(kanya pujan, Kumari Pooja)
महाअष्टमीला तीन वर्षांच्या मुलीची त्रिमूर्ती म्हणून पूजा केली जाते. अशा मनोभावे केलेल्या पूजेने आपणास तन, मन आणि धन या तिन्ही बाजूंनी अपार सुखांची प्राप्ती होते.
4 वर्षांची कुमारिका कल्याणी
(kumarika pujan, Kumari Pooja)
नवरात्रीमध्ये चार वर्षाच्या मुलीचे पूजन कल्याणी रूपात केले जाते. हे माता भगवतीचे भक्तांचे कल्याण करणारे अर्थात कल्याणी रूप मानले जाते.
5 वर्षांची कुमारिका रोहिणी
(kumarika pujan, Kumari Pooja)
या वयाच्या कुमारी मुलींना रोहिणी असे म्हणतात. ज्या भक्तांना विद्या प्राप्ती, सिद्ध शक्तींची साधना करायची आहे, त्यांनी पाच वर्षांच्या कुमारिकेचे पूजन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. यामुळे जीवनातील संकटे दूर होतात आणि मनातील अदृश्य भीती निघून जाते. अमोघ विद्या प्राप्ती होते.
6 वर्षांची कुमारिका काली
(kumarika pujan, Kumari Pooja)
कुमारी पूजा विधीमध्ये सहा वर्षांची मुलगी ही दुर्गादेवीचे काली रूप मानले जाते. या कुमारी पूजनाने षटकर्म सिद्धी तसेच धनसमृद्धी प्राप्त होते.
7 वर्षांची कुमारिका चंडिका
(kumarika pujan, Kumari Pooja)
कुमारिका पूजनात सात वर्षाच्या मुलीचे रूप हे चंडिका रूप मानले जाते. या पूजा विधीने भक्ताला राज्यप्राप्ती होते, अशी भावना आहे.
8 वर्षांची कुमारिका शांभवी
(kumarika pujan, Kumari Pooja)
हिंदू धर्म मान्यतेनुसार, आठ वर्षांची मुलगी ही दुर्गादेवीचा शांभवी अवतार मानली जाते. या कुमारिका पूजनाने भक्ताला धनसंपत्ती, सुखसमृद्धी यांचा लाभ होतो.
9 वर्षांची कुमारिका दुर्गा
(kumarika pujan, Kumari Pooja)
नवरात्री उत्सवात 9 वर्षांची मुलगी ही माता दुर्गा मानली जाते. या कुमारी पूजनाने भक्तांच्या सर्व इच्छा, मनोकामना सफल होतात. त्याला अपरिमित सुखांची प्राप्ती होते.
10 वर्षांची कुमारिका सुभद्रा
(kumarika pujan, Kumari Pooja)
कुमारिका पूजनात माता भगवतीचे हे सुभद्रा रूप मानले जाते. अशा लहान मुलीची पूजा केल्याने भक्ताला जे जे हवे, ते सगळे लाभ होतात. माता भगवती भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करते, अशी धारणा आहे.
(Navratri Mantra And Shlokas)
| अंबे एक करी, उदास न करी |
(Ambe Ek Kari Udas Na Kari)
अंबे एक करी, उदास न करी, भक्तास हाती धरी |
विघ्ने दूर करी, स्वधर्म-उद्धरी, दारिद्रय माझे हरी ||
चित्ती मूर्ती बरी वरअभय करी ध्यातो तुला अंतरी|
वाचा शुध्द करी, विलंब न करी, पावे त्वरे सुंदरी |१||
माते एकवीरे, वरा अभयकरे, दे तू दयासागरे |
माझा हेतु पुरे, मनात न उरे, संदेह माझा हरे ||
जेणे पाप सरे, कुबुध्दी विसरे, ब्रम्हैक्य-धी संचरे |
देई पूर्ण करे, भवाम्बुधी तरे, ऐसे करावे त्वरे ||२||
अनाथासी अंबे नको विसरु वो |
भवसागरी सांग कैसा तरु वो ||
अन्यायी मी हे तुझे लेकरु वो |
नको रेणुके दैन्य माझे करु वो ||३||
मुक्ताफलै: कुंकुम-पाट्लांगी |
सदेह तारानिक रैविभाती ||
श्री मूळपीठाचल चंडिकाया |
तां एकवीरां शरणं प्रपद्ये ||४||
सखे दु:खिताला नको दुखवू वो |
दीना बालकाला नको दुखवू वो ||
ब्रीदा रक्षी तू आपुल्या श्री भवानी |
ही प्रार्थना ऐकुनी कैवल्यदायनी ||५||
॥ सदानंदीचा उदयोस्तु ॥
---
मित्र - मैत्रिणींनो, नवरात्री उत्सव हा आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानीचा उत्सव आहे. हा दुर्गा देवीचा अंश असलेल्या स्त्रीशक्तीचे पूजन करण्याचा उत्सव आहे. स्त्रीशक्तीचा जागर आहे. प्रत्येक घरातील कन्या ही मातेचे बालरुप आहे. नवरात्री उत्सवात कन्या पूजन, कुमारी पूजन करण्याची परंपरादेखील त्यातूनच आली आहे. मुलीच्या पावलांनी माता लक्ष्मी घरात आली, असे आपण म्हणतो ते उगाच नाही. अशाच लेकींच्या गौरवाचा हा शुभदिन म्हणूयात. चला, भक्तिभावाने कन्या पूजन करूयात. हा लेख आपणास आवडला तर नक्की शेअर करा.
| जय जगदंब |
नवरात्री उत्सवाच्या भरभरून शुभेच्छा...!
धन्यवाद.
***