*मास्क ऑफ जॉय*






प्रभादीप हॉस्पिटलचे सीईओ श्री. कुलकर्णी यांच्या केबिनमधून अरविंद नाकावरील मास्क सावरत बाहेर पडला. हातातल्या छोट्याशा पिशवीला कपाळाशी लावून त्याने काही क्षण डोळे मिटले. पुन्हा आकाशाकडे पाहत मनातच काही तरी म्हटले आणि खाली पार्किंगच्या दिशेने झपाझप चालू लागला. 

झाडावरून पडतो की काय अशी मनात भीती असते त्यावेळी जशी एखादी छोटीशी फांदी हाती लागावी, तशी त्याच्या हातातही आता एक फांदी आली होती. पण झाडावरून उतरणे मात्र आणखी राहिलेलेच होते. हॉस्पिटलच्या पार्किंगमधून कशीबशी गाडी बाहेर काढून अरविंद रस्त्याला लागला पण मनात विचारांचं ट्रॅफिक सुरूच होतं. एव्हाना सुनयनाचे एक-दोन मिसकॉल पडले होते. 

अरविंदचा धडपड्या स्वभाव प्रभादीप हॉस्पिटलचे सीईओ डॉ. कुलकर्णी यांना माहीत होता. मोठ्या हॉस्पिटलचा कारभार सांभाळत असताना डॉ. कुलकर्णी यांनी वेळोवेळी माणुसकीची भावना जपली होती. आताशा तर त्यांच्यामागचा कामाचा ताण आणखीनच वाढलेला होता. त्याचे कारण म्हणजे कोरोना. कोरोना आला तसा आपल्यातून बरेच काही घेऊन गेला होता. अरविंदचं सुखी कुटुंबही त्यातून सुटलेलं नव्हतं. अरविंदला कोरोनानं मॅनपॉवर कटिंगच्या चक्रात पकडून बेरोजगार केलं होतं. बऱ्यापैकी सुखात असलेलं अरविंदचं चौकोनी कुटुंब गेल्या चार-पाच महिन्यांपासून डबघाईला आलं होतं. पत्नी सुनयना शिवणकाम करायची, घराला थोडा हातभार लागावा म्हणून. पण या सगळ्या रहाटगाडग्यात कमाईची पार वाट लागली होती. त्यामुळं आताशा नेहमीच अरविंदच्या डोक्यात ट्रॅफिक जॅम चालायचं. 

हॉस्पिटलमधून रस्त्याला लागल्यानंतर एका झाडाखाली गाडी लावून अरविंदनं विजुसेठला फोन लावला. त्याच्याशी काही तरी बोलणं झालं. शेवटी ओके ओके म्हणून त्यांनी फोन ठेवला. आता झालं...! अरविंदच्या हाती आता दुसरी फांदी पण आली होती. 

पंधरा-वीस मिनिटात अरविंद घरी आला. सुनयना त्याची वाटच पाहत होती. आल्या आल्या तिनं विचारलं, काय झालं हो... काय म्हणाले सर... आवडले का त्यांना मास्क.... पुढचं काही बोलणं झालं का...? 

आता अरविंदच्या ओठात हसू होतं आणि डोळ्यात आसू...! हातातली पिशवी सुनयनाकडे देत त्यानं तिला कडकडून मिठी मारली. अगं... काम फत्ते झालं... आई जगदंबेचा आशीर्वाद आणि तुझे प्रयत्न... दोन्ही पण सक्सेसफुल...!!! तब्बल ३००० मास्कची ऑर्डर दिलीय त्यांनी...! जॉबचं पण सांगणार आहेत लवकरच...! विजुसेठनी घरी बोलावलंय मला कपडा द्यायला...! 

खूप दिवसांनंतर आलेला या चौकोनी कुटुंबाच्या बैठकीतला हा क्षण खरेतर टिपण्यासारखा होता. सुनयना आणि अरविंद दोघंही एका निराळ्याच आनंदात होती....! 

मार्च २०२० पासून कोरोना ठाण मांडून बसलाय आपल्याकडे... बरेच काही घेऊन गेलाय तो... पण आपल्या नाकावरच्या या छोट्याशा हिरव्या, पिवळ्या, निळ्या कपड्यानं किती तरी कुटुंबांना सावरलंय या कठीण काळात... कित्येकांच्या ताटात दोन सन्मानाचे घास वाढलेत... किती तरी मायमाऊलींच्या हातांना आणि शिवणयंत्रांना गती दिलीय....! मास्कच्या विक्रीतून कित्येक तरुणांना उभं केलंय...!!! 

आपल्या तोंडावर असलेला मास्क कुठल्याही रंगाचा असला तरी या कुटुंबांसाठी तो रुपेरी ठरलाय... चंदेरी ठरलाय... सोनेरी ठरलाय... हे निश्चित. याला नुसतं मास्क न म्हणता `मास्क ऑफ जॉय` म्हटलं तर...! पटतंय ना तुम्हाला पण...!   

धन्यवाद...!

- *संदीप प्रभाकर कुलकर्णी, औरंगाबाद.*

(आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा... मास्क ऑफ जॉय)

------------------------------------

Previous Post Next Post