वेळ कुणासाठी थांबत नाही हो...! Time Never Stops...!
By संदीप प्रभाकर कुलकर्णी
***
रेल्वेस्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर असलेल्या बाकड्यावर बसून किलकिल्या डोळ्यांनी आजी येणाऱ्या गर्दीकडे पाहत होती. गर्दीत सारेच दिसत होते... मामा-मामी, आई-बाबा, काका-काकू, आत्या... पण दिसत नव्हता तो तिचा लाडका नातू कार्तिक! 10 वाजत आले होते, पण कार्तिक काही अजून आला नव्हता. शेवटी गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन थांबलीदेखील. आता थोड्याच वेळात आजी इंदोरकडे रवाना होणार होती. भाऊ मामाने लगबग करून आधी बर्थ शोधला आणि सामान आत ठेवून तोही पुन्हा नातेवाईकांच्या गर्दीत मिसळला. 10.15 ला गाडी निघणार होती. आता मात्र कार्तिक काही येत नाही, असा विचार करून मामाने आजीचा हात हातात घेऊन तिला सावकाश खिडकीजवळच्या सीटवर बसवले. सावकाश जा, पोरांकडे नीट लक्ष दे, तब्येतीची काळजी घे... अशा आपुलकीच्या संवादांची देवाणघेवाण सुरूच होती. आजीचे डोळे पाणावले होते. गर्दीत कार्तिकला शोधणारे डोळे कसेबसे पुसत आजी प्रेमभरल्या नजरेनं सगळ्यांना पाहत होती....! इतक्यात शेवटचा आलार्म झाला आणि गाडीने गती घेतली. आजीने आता इंदोरकडे प्रस्थान केलं होतं.
* वेळ निघून गेली होती !
स्टेशनच्या बाहेर पडण्यासाठी झालेल्या गर्दीतून वाट काढत आई - बाबा आणि सारेच नातेवाईक मेन गेटपर्यंत येत नाहीत तोच कार्तिक धावत पळत येताना दिसला. अरे, काय गेली गाडी...? मला वाटलं लेट असंल... बाबा झालं काय की रस्त्यानं गर्दी, सिग्नल... त्यामुळं यायला थोडा उशीर झाला. कार्तिक बोलत होता. कारणं सांगत होता, पण आता वेळ निघून गेली होती....!
* अधुरं राहिलेलं स्वप्न
अगदीच खिन्न चेहऱ्यानं रश्मी कॉलेजजवळच्या गार्डनमध्ये बसली होती. एकटीच. पाठीवरची सॅक हातात घेऊन तिनं डोक्यावरचा स्कार्फ काढला आणि कपाळाला लावून घाम पुसला. आता काय करायचं हा विचार तिचा चेहराच सांगत होता. कपाळावर दोन-तीन हलके पंच मारून ती मनातल्या मनात काही तरी बोलत होती. मम्मी-पप्पा काय म्हणतील...? त्यांना काय सांगायचं आणि कसं...? सगळे आपल्यालालाच ब्लेम करतील...! आता करायचं तरी काय...? असे विचार मनात येत असतानाच एक हलकासा फ्लॅश बॅक तिच्या डोळ्यासमोरून सरकला होता. रात्री पुन्हा एकदा रिव्हीजन करून सगळी उत्तरं पाठ केली होती. सकाळी सहाला उठायचं म्हणजे उठायचंच असा विचार करून ती झोपली होती. पण नेमका सवयीने दगा दिला आणि सहाचे साडेसात केव्हा झाले हे रश्मीलाही कळलं नाही. मग सुरू झाली आवरासावर. ताणाताण. एक गोष्ट हुकली की पुढच्या सगळ्याच गोष्टी कशा चुकत जातात, याचा अनुभव रश्मीला नवीन नव्हता, पण आता करणार काय! परीक्षेची वेळ होती 11 ची. सेंटरही काही जवळ नव्हतं. जायला अर्धा पाऊण तास लागणार होता. सुपरफास्ट वेगानं गाडी दामटली तरी रस्ता आपला नसतो हो... ट्रॅफिकही आपल्या हातात नसते... आणि परिस्थितीही...! कशीबशी धावत पळत ती सेंटरवर पोहचली खरी, पण तोपर्यंत 11.15 उलटून गेले होते. गेटमन, अधिकारी, सर - मॅडम यांना खूप रिक्वेस्ट करून झाल्या. प्लीज... प्लीज... चा तर अख्खा पाढा म्हणून झाला. पण सेंटरवरच्या अधिकाऱ्यांचे हातही नियमाने बांधलेले होते...! शासकीय अधिकारी होण्याचं रश्मीचं स्वप्न केवळ काही मिनिटांनी साफ संपवलं होतं. आता पुन्हा तयारी करायची होती दुसऱ्या Attempt ची. इथेही आडवे आले होते, घड्याळाच्या छोट्याशा डबीत दिसणारे तीन काटे...!
* हे बदलायला हवं !
मित्रांनो, तसं पाहिलं तर आपलं आयुष्य खूप छोटंही आहे आणि मोठंही. आपल्या सर्वांच्याच हातात नक्की केवढा वेळ आहे, हे ना तुम्ही जाणता ना मी जाणत. तरीही वेळ न पाळण्याची, वेळेचं भान न ठेवण्याची सवय अनेकांना असते. जाऊ द्या हो, काय होतं पाच दहा मिनिटांनी... जाऊ निवांत... असं म्हणून आपण आपली सवय मोडायला तयार नसतो. त्यामुळे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात, तेवढ्यापुरते आपण निराशही होतो... आणि पुढं पुढं चालायला लागतो. पण हे बदलायला हवं.
* On Time जमायलाच हवं!
पहाटे फारसं कुणी उठत नाही म्हणून अवघ्या जगाला प्रकाशमान करणारा सूर्यदेव आपली ड्युटीची वेळ कधी चुकवत नाही. समजा, त्यानंही असं ठरवलं तर... जाऊ द्या हो.. निघूया निवांत !
बंद पडलेलं घड्याळही आपण वापरत नाही, कारण काय तर ते थांबलंय! चला तर मग, आपणही आपली सगळी कामं वेळच्या वेळी करूयात. घड्याळाचे काटे आपल्या मर्जीने पळणार नाहीत, तर आपल्याला त्यांच्याबरोबर जावं लागणार आहे. खरंय ना ! Before Time जमलं तर फारच Best. पण On Time मात्र जमायलाच हवं. काय आहे की, वेळ कुणासाठी थांबत नाही हो...! धन्यवाद.
***