खरंच राहून जातं बोलायचं ! If We Speak !
- By संदीप प्रभाकर कुलकर्णी
| Quotes | Motivational | Morning Quotes | Good Morning Status |
---
मित्रांनो, तुम्ही आम्हीच नाही... असे अनेक जण असतील, ज्यांच्या मनात कुठे तरी खंत असते... विषाद लपलेला असतो. तो हा की, खरंच त्यावेळी मी बोलायला हवं होतं. होय, वेळच्या वेळी कामं करणं जसं गरजेचं असतं, अगदी तसंच वेळच्या वेळी समर्पक बोलणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. पण होतं काय की, कधी दुराभिमान आडवा येतो, तर कधी आपला भिडस्त स्वभाव. पण अशाने प्रश्न सुटत नाहीत, तर ते आणखी गुंतागुंतीचे होऊन बसतात. काही वेळा न बोलण्यानं नात्यांमध्ये पडलेली छोटीशी भेगही मोठी दरी होऊन जाते. कोणतंही कारण नसताना गैरसमज वाढत जातात. कालांतरानं अबोला येतो. आणि सरतेशेवटी नाती थांबतात.
मनात खूप काही चांगलंचुंगलं असतं, पण ते ओठांवर येत नाही कुणाच्याच. ना याच्या ना त्याच्या. अशा वेळी कधी तरी एकांतात मनात विचार येतो... खरंच यार, बोलायचं राहूनच गेलं...! पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. सावरायचे ते काही क्षणही आपल्या हातून निसटलेले असतात.
या सगळ्या निःशब्द प्रवासाचा प्रारंभ कुठून झालेला असतो, तर आपल्या न बोलण्यातून. सगळ्यांचंच जीवन क्षणभंगुर आहे. जीवनपटाच्या या रंगमंचावर Entry ही आपल्या हाती नाही आणि Exit ही. तेव्हा मनात काही आलं तर निःशंक बोला...! बोलत राहा... हसत राहा... फुलत राहा अन् फुलवत राहा...!
-----
By संदीप प्रभाकर कुलकर्णी.
-----