श्री गणेश उत्सव साजरा करूया, गणपती बाप्पा मोरया !

श्री गणेश उत्सव साजरा करूया, 

गणपती बाप्पा मोरया ! 

----
मित्रांनो, तुमची गणेश उत्सवाची तयारी झालीच for असेल. सुंदर आरास, सजावट आणि Colourful फुलांच्या हारांनी सजविलेल्या मखरात आता आगमन होणार आहे गणपती बाप्पाचे. गणेश उत्सव साजरा करण्याचे मेसेज, संदेश तुम्हीही मित्रांना पाठवलेच असतील. बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !!! लालबागच्या राजाचा विजय असो !!! ही शान कुणाची, लालबागच्या राजाची !!! 

आपल्या सर्वांचा लाडका, देवाधिदेव महादेव आणि माता पार्वतीचा बाळ ढोल-ताशा आणि संगीताच्या निनादात आपल्या घरी येत आहे. आणि हो, चक्क दहा दिवस मुक्कामी राहणार आहे. मंगळवार २९ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा आपल्या घरी येत आहेत. श्री गणेशाचे आगमन म्हणजे उत्साह आणि जल्लोष, मिरवणूक, दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती, पानाफुलांची सजावट, दूर्वा, गोड गोड मोदक, उकडीचे मोदक, लाडू-पेढे यांचा प्रसाद, श्री गणपती प्रार्थना आणि भक्तिगीतांचा गजर. गणेश उत्सवात सगळीकडे अगदी उत्साहाचे वातावरण असते. गणेश उत्सवाचे दहा दिवस कसे निघून जातात, हे लक्षातही येत नाही. 
समस्त देवांमध्ये गणपती बाप्पा सर्वाधिक मानाचा आहे. कुठल्याही कार्याचा प्रारंभ करायचा झाल्यास आपण सर्वात आधी श्री गणपतीची पूजा करतो. लग्नाच्या पत्रिकेपासून ते थेट गाडीच्या स्टिअरिंगच्या समोर विराजमान असतो आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा. श्री गणेश विद्यादाता आहे. सुखदाता आहे. विघ्नहर्ता आहे. सुखकर्ता आहे. दुःखहर्ता आहे. ६४ कलांचा अधिपती गणाधिपती गणपती बाप्पा आपल्या मूषक या वाहनावर स्वार होऊन धरतीवर येत आहे. संकटकाळी भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देऊन सर्वप्रथम मदतीसाठी हजर होणारा गणपती बाप्पा लहानथोरांचा लाडका आहे. गणपती बाप्पा घरी येणार असल्याने सध्या सगळ्यांच्या घरी मंगलमय वातावरण दिसून येत आहे. गणपती श्लोकांचे अर्थ तुम्हाला माहित आहेत का? येथे दररोजच्या प्रार्थनेत म्हटले जाणारे श्लोक तुमच्यासाठी अर्थासहित देत आहोत. 

श्री गणेश प्रार्थना 
गणपती बाप्पाचे महत्वाचे श्लोक 
---

* वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

(अर्थ - गोल वळणाकार सोंड असलेले, विशाल काया अर्थात महाकाय भव्य शरीर असलेले, ज्यांचे तेज कोटी सूर्यांसारखे आहे असे असे माझे दैवत भगवान श्रीगणेश, माझी सर्व कार्ये निर्विघ्न म्हणजे कोणत्याही संकटांविना पार पडावीत, यासाठी माझ्यावर कृपा करावी.) 
------
* एकदंताय विद्‍महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दंती प्रचोदयात।।   
(अर्थ - हे एकदंता (श्रीगणेश), हे वक्रतुंडा (भगवान गणेश) आम्हाला प्रत्येक कार्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा द्यावी.) 
------
* गणपती श्लोक
नेत्री दोन हिरे, प्रकाश पसरे
अत्यंत ते साजिरे 
माथा शेंदूर पाझरे वरीवरे 
दूर्वा़ंकुराचे तुरे
माझे चित्त विरे 
मनोरथ पुरे
देखोनी चिंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवी रे
त्या मोरयाला स्मरे ।।
-------
* मोरया मोरया मी बाळ तान्हे । 
तुझीच सेवा करू काय जाणे ।।
अन्याय माझे कोटयानकोटी ।
मोरेश्वरा बा, तू घाल पोटी ।।
--------
मित्रांनो, गणेश उत्सवात आरतीला खूप महत्व आहे. सगळे भक्तगण एकत्र येऊन गणपतीची आरती म्हणतात. आपण घरातही गणपतीची आरती करतो. टाळ, घंटा आणि टाळ्यांच्या निनादात होणाऱ्या घरच्या आरतीच्या वेळी घरात एकदमच प्रसन्न वातावरण असते. सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरतीवेळी ढोल-ताशा पथक, झाँज पथक, लाऊड स्पीकर असा सर्व लवाजमा असतो. ढोल ताशाच्या जोरदार निनादात श्री गणपतीची आरती होते. परम वंदनीय श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली श्री गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची... सगळ्यांना पाठच असते. तरीही सर्वात मधुर आणि मंजुळ आवाजात स्वर्गीय लतादीदींनी गायिलेली आरती एकमेवच आहे. सुखकर्ता दुःखहर्ता यासह गणपती बाप्पाच्या काही अतिशय सुंदर आरत्या येथे देत आहोत. 

* ।। श्री गणपती आरती ।। 
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची ।
नुरवी पुरवी प्रेम, कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची ।।१।।
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती ।।धृ।।
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी, कुमकुम केशरा ।
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।।२।।
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना ।
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा, वाट पाहे सदना ।
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ।
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥ 
--------

।। श्री गणेश जी की आरती ।। 


शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहर को ।
हाथ लिए गुड लड्डू सांई सुरवर को ।
महिमा कही न जाय लागत हूं पाद को ॥
जय देव जय देव... 
जय जय श्री गणराज
विद्या सुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन
मेरा मन रमता,
जय देव जय देव ।।

अष्टौ सिद्धि दासी संकट को बैरि ।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।
कोटीसूरज प्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारी ।।
जय देव जय देव...
जय जय श्री गणराज
विद्या सुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन
मेरा मन रमता,
जय देव जय देव ।।

भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतति संपति सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ।।
जय देव जय देव,
जय जय श्री गणराज
विद्या सुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन
मेरा मन रमता,
जय देव जय देव ।।
--------
* ।। श्री गणेश आरती ।। 

जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा ।।
जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा ।।

एकदन्त दयावंत, चार भुजा धारी ।
माथे पर तिलक सोहे, मुसे की सवारी ।।
पान चढ़े फुल चढ़े, और चढ़े मेवा ।
लडुवन का भोग लगे, संत करे सेवा ।।
जय गणेश, जय गणेश देवा...

अंधन को आँख देत, कोढ़िन को काया ।
बांझन को पुत्र देत, निर्धन को माया ।।
सुर श्याम शरण आये, सफल कीजे सेवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा ।।
जय गणेश, जय गणेश देवा... 

जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा ।।
---------

* गणपतीची आरती कशी म्हणावी? 

---
मित्रांनो, आज या ठिकाणी आपण आणखी एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, तुम्ही सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती अनेकदा म्हटली आहे आणि ऐकलीही आहे. आज आपण गणपतीची आरती शुद्ध स्वरूपात आणि योग्य उच्चारात कशी म्हणायची, ते पाहूया. 
* सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची ।
नुरवी पुरवी प्रेम, कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची ।।१।।
(यात आरती म्हणताना उटी शेंदुराची याप्रकारे म्हणावे. तेच योग्य आहे. काही जण ओटी किंवा वटी असे म्हणतात. तसेच कंठी झळके माळ असे स्पष्ट म्हणावे. जळके - जळकी असे म्हणणे चुकीचे आहे.)    
-------
* हिरेजडित मुकुट, शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।।२।।
(या ठिकाणी हिरेजडित मुकुट, शोभतो बरा असे स्पष्ट म्हणावे. काही ठिकाणी शोभे तोबरा असे तुम्हीही ऐकले असेल. आपला गणपती बाप्पा तोबरा कशाला भरेल,असा विचार प्रत्येकाने करावा.) 
--------
* लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना ।
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा, वाट पाहे सदना ।
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ।
(गणपती आरती म्हणताना अनेक ठिकाणी या कडव्यात चुका होतात. आरती म्हणताना लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना असे स्पष्ट म्हणावे. फणिवर वंदना असे नाही. भगवान शंकराच्या गळ्यात विराजमान असलेले नागराज, या नागराजाचे बंधन ज्यांनी आपल्या कमरेवर धारण केले आहे असे श्री गणपती. त्यामुळे येथे बंधना असेच म्हणावे. दुसऱ्या ठिकाणी दास रामाचा, वाट पाहे सदना असे म्हणावे. श्री गणपती बाप्पांनी आपल्या घरी यावे, यासाठी श्री रामदास स्वामी वाट पाहत आहेत, प्रतीक्षा करीत आहेत, असे या कडव्यात अभिप्रेत आहे. सजना असे म्हणून आपण त्यात चूक करीत आहोत हे लक्षात घ्यावे. संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना या ओळीत संकटी असे म्हणावे, संकष्टी नाही. संकटात आमचे रक्षण करावे, अशी प्रार्थना आपण बाप्पाला करीत आहोत.) 

चला तर मित्रांनो, आपण सगळे जण यंदाचा गणेश उत्सव आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने साजरा करूयात. सार्वजनिक गणपती मंडळांनी गणेश उत्सव हा आपल्या भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्यावे. उत्सवाच्या दहा दिवसात लाऊड स्पिकरवरून धांगडधिंगा, अमराठी गाणी किंवा सिनेमातील गाणी न वाजवता, गणपती स्तोत्र, श्री गणेश श्लोक, मंत्र, नामस्मरण, गणपती अथर्वशीर्ष मोठ्या आवाजात सर्वांना ऐकवावे. काय सांगता, पुन्हा पुन्हा ऐकून काही जणांना ते पाठ होऊ शकते. लहान मुलांसाठी स्पर्धा घ्याव्यात. दररोज आरतीच्या वेळी मंडळाचे आणि देवतेचे पावित्र्य राखावे. गणेश उत्सव हा आपला उत्सव आहे. समस्त भारतीयांचा उत्सव आहे. भक्तिभावाचा उत्सव आहे. त्यामुळे संस्कृती आणि धार्मिकतेचे पालन करणे, हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. 
।। गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ।। 
आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद...!  
मित्रांनो, या लेखातून आपणाला काही नवीन माहिती मिळाली असल्यास, आपल्याला लेख आवडल्यास अवश्य कमेंट करा. तुमच्या योग्य सूचना आमच्यासाठी अनमोल आहेत.
---------
संदीप प्रभाकर कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर.
Previous Post Next Post